कोल्हापूरची शाल्मली पुण्याची डेक्कन एक्स्प्रेस, गाजवतेय फुटबॉल क्षेत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 04:44 PM2022-10-10T16:44:23+5:302022-10-10T16:44:40+5:30

कोल्हापुरात पुरुषांच्या फुटबॉलला जसे राज्यासह देशभरात ग्लॅमर निर्माण झाले आहे. तसेच ग्लॅमर महिला संघातील खेळाडूंनाही मिळण्यास सुरूवात

Eighteen-year-old national footballer Shalmali Tanaji Chavan is originally from Kolhapur but currently plays football for Pune Deccan Club | कोल्हापूरची शाल्मली पुण्याची डेक्कन एक्स्प्रेस, गाजवतेय फुटबॉल क्षेत्र

कोल्हापूरची शाल्मली पुण्याची डेक्कन एक्स्प्रेस, गाजवतेय फुटबॉल क्षेत्र

googlenewsNext

सचिन भोसले

कोल्हापूर: कोल्हापुरात पुरुषांच्या फुटबॉलला जसे राज्यासह देशभरात ग्लॅमर निर्माण झाले आहे. तसेच ग्लॅमर महिला संघातील खेळाडूंनाही मिळण्यास सुरूवात झाली आहे. एका महिला संघाची जुळवाजुळव करताना दादा मंडळींना नाकीनऊ येत होते. आजमितीला महिलांचा एक व्यावसायिक संघ व १६ शाळांचे मुलींचे संघ आहेत. याच मुशीतून तयार झालेली अठरा वर्षीय राष्ट्रीय फुटबॉलपटू शाल्मली तानाजी चव्हाण ही मूळची कोल्हापूरची, पण सध्या पुण्याच्या डेक्कन क्लबकडून फुटबॉल क्षेत्र गाजवत आहे. तिचं हे खेळणं कोल्हापूरच्या महिला फुटबॉल क्षेत्राची कक्षा आणखी रुंदावण्यासारखंच आहे.

उषाराजे हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीला असताना रघू पाटील सर इतर मुलींना फुटबॉलचे धडे देत होते. हे बघून मलाही हा खेळ आवडू लागला. मग शालेय स्तरावर त्यांच्या मार्गदर्शनाली खेळू लागले. पुढे १४ वर्षांखालील राज्य, राष्ट्रीय सुब्रोतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. नवी दिल्ली येथे झालेल्या १७ वर्षांखालील सुब्रोतो मुखर्जी आंतरराष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधी करण्याची संधी मिळाली. याच स्पर्धेत अफगाणिस्तान, श्रीलंका, नेपाळ येथील संघही सहभागी झाले होते.

तेथील खेळाची दखल घेत पुण्याच्या डेक्कन स्पोर्टसने मला मागील वर्षी निमंत्रित केले. खेळाच्या विविध चाचण्या घेतल्यानंतर फुटबॉलमध्ये नाव कमवायचे असेल तर इथेच राहावं लागेल, असं सुचवलं. हा संघ पूर्णपणे व्यावसायिक असल्यामुळे यातून करिअरची संधी मिळाली. आय. डब्ल्यू. एल. लीगसारख्या व्यावसायिक स्पर्धेत आपल्या खेळाच्या जोरावर माझी निवड झाली. पहिले सामने अक्षरशः कट्ट्यावर बसावे लागले. त्यानंतर माझ्या खेळाचा दर्जा पाहून दोन सामन्यांत मला खेळण्याची संधी दिली. त्या संधीचे सोने करत मी आता माझी स्वतःची जागा स्ट्राइकर आणि राईट विंगर म्हणून या संघात निर्माण केली आहे.

खेळासाठी बारावीनंतर तिने पुण्यातील मॉडर्न कॉलेजला प्रवेश घेतला. खेळाबरोबरच शैक्षणिक करिअरही तिला करायचे आहे. फुटबॉल हा केवळ खेळ नसून, या खेळातून करिअर करण्याची मोठी संधी आहे. माझ्या आई-वडिलांप्रमाणे इतर पालकांनीही पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या खेळात मुलींना प्रोत्साहित करावे, असे शाल्मली आवर्जून सांगते.

Web Title: Eighteen-year-old national footballer Shalmali Tanaji Chavan is originally from Kolhapur but currently plays football for Pune Deccan Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.