आठवीतच शिष्यवृत्ती, एनएमएमएस परीक्षा एकाच वर्षी घेऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:29 AM2021-09-24T04:29:20+5:302021-09-24T04:29:20+5:30
सरवडे : इयता आठवीच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्षासाठी माध्यमिक शिष्यवृत्ती व एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. एकाच ...
सरवडे : इयता आठवीच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्षासाठी माध्यमिक शिष्यवृत्ती व एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. एकाच वेळी असलेल्या या दोन शिष्यवृत्ती परीक्षा व शाळेची परीक्षा यामुळे मुलांना ताणतणावाखाली अभ्यास करावा लागतो. एकाच वर्षी तीन परीक्षा व त्याही महत्त्वाच्या असल्याने नेमका अभ्यास कोणत्या परीक्षेचा करायचा याचा प्रश्न मुलांसमोर निर्माण होऊन गोंधळून जातात.
मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा होणाऱ्या त्रासाचा विचार करून दोन शिष्यवृत्ती परीक्षा एकाच वर्षी न घेता वेगवेगळ्या वर्षात घ्याव्या, अशी मागणी येथील शिवाजीराव खोराटे विद्यालयाच्या शिक्षिका एस.आर. गुरव यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.
याबाबत त्यांनी म्हटले आहे, परीक्षा परिषदेतर्फे इयता आठवीच्या मुलांसाठी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा व एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. एन. एम. एम. एस. ही परीक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी असून ही परीक्षा पुढील शिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या उपयुक्त ठरते.
मात्र दोन परीक्षा व शाळेची परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा मोठा ताण येतो. त्याचा परिणाम मानसिकतेवर व अभ्यासावर होतो. अनेक विद्यार्थी इच्छा असूनही एकच परीक्षा देतात व त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी शिक्षण विभागाने माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातवीसाठी व आठवीसाठी एन.एम.एम.एस. परीक्षा घेणे मुलांच्या दृष्टीने हिताचे ठरणार आहे. यापूर्वी माध्यमिक शिष्यवृत्ती ही सातवीत होत होती ती पूर्ववत सुरू करावी.
निवेदनाच्या प्रती शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण विभागाचे अधिकारी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना पाठवल्या आहेत.
.
दोन्ही परीक्षेत मिळेल यश
इयता आठवीत असताना विद्यार्थ्यांना या दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षा महत्त्वाच्या असून देखील बहुतांशी विद्यार्थी गुणवत्ता असतानाही एकच परीक्षा निवडतात. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांकडे चांगली गुणवत्ता असतानाही अभ्यासाच्या दबावामुळे एकच परीक्षा देतात. त्यामुळे एका शिष्यवृत्तीला मुकावे लागते. या परीक्षा वेगवेगळ्या वर्षात असतील तर गुणवंत विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षेत यश मिळवता येणार आहे. अभ्यासाचा ताण कमी होईल.
फोटो
राधानगरी : गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देताना एस. आर.गुरव.