मँचेस्टर आघाडी बेदखल
By admin | Published: March 26, 2016 12:18 AM2016-03-26T00:18:15+5:302016-03-26T00:20:37+5:30
सुरेश हाळवणकर : इचलकरंजी पालिका; उमेदवारी मागणी प्रस्तावाचा विचार करू
इचलकरंजी : नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन उदयास येणाऱ्या मॅँचेस्टर आघाडीची फारशी दखल घ्यावी असे वाटत नाही; मात्र, आघाडीकडून उमेदवारी वाटपाचा प्रस्ताव आल्यास त्याचा विचार करता येईल, असे मत आमदार सुरेश हाळवणकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार हाळवणकर बोलत होते. नव्याने स्थापन होणाऱ्या आघाड्यांना कोणता चेहरा आहे, असे म्हणत त्याची खिल्ली उडवून ते म्हणाले, कुणाच्या तरी महत्त्वाकांक्षेपोटी होणाऱ्या आघाड्या टिकत नाहीत. त्याचा विचार निवडणूक समोर आल्यावर केला जाईल. तरीसुद्धा तथाकथित आघाडीकडून काही उमेदवार मागणीचा प्रस्ताव आल्यास त्याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नगरपालिकेत शहर विकास आघाडीने नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे यांच्या बंडाला पाठिंबा दिला असला तरी त्यामागे आवाडे यांच्या सत्तेला धक्का देणे, असा उद्देश होता. मात्र, आम्ही काही नगरपालिकेच्या सत्तेत नाही, असे सांगून आमदार म्हणाले, शासनाकडे नगरपालिकेच्या कामासाठी काही प्रस्ताव दाखल करावयाचे असल्यास तेथे असलेल्या कॉँग्रेसच्या सभापतींची मनधरणी करावी लागते. त्यामुळेच नगरपालिकेच्या कामांना विलंब होत आहे. (प्रतिनिधी)
मक्तेदार नगरसेवक : पालिकेची कामे दर्जाहीन
नगरपालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांची कामे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करून घेण्याविषयी आमदार हाळवणकर म्हणाले, नगरपालिकेमध्ये अप्रत्यक्षरीत्या नगरसेवकच मक्तेदार झाले आहेत. त्यामुळे पालिकेच्या कामांचा दर्जा दुय्यम झाला आहे. म्हणून नगरपालिकेमार्फत नागरिकांना द्यावयाच्या सेवा-सुविधांचा विचार केला, तर दर्जेदार रस्ते लोकांना मिळावेत म्हणून ते शासनाच्याच सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करून घेण्यात येतील. त्याचबरोबर कृष्णा नदीची दाबनलिका बदलण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करून घेतले जाईल.