निविदा काढून देशभरातील कंपन्यांकडून पूरग्रस्त भागात मदत मागवणार : एकनाथ शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:05 AM2019-08-14T00:05:01+5:302019-08-14T00:09:11+5:30
निविदा काढून ६० दिवसांत अनुभवी कंपनी कडून मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री मागवण्याचा निर्णय झाल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर : महापुरामुळे बाधीत पूरग्रस्तांसाठी काम केलेल्या देशातील कंपन्यांकडून निविदा मागवून मदत घेण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मोठया महापालिका प्रशासनाकडुनही मनुष्यबळ पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापुरात कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात पत्रकारांसाठी आयोजित आरोग्य शिबिराला शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली व उपचार करण्यात आले.
याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, राजन विचारे, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.एस.केम्पी पाटील, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक उमेश कदम, डॉ.सुप्रिया देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी हर्षला वेदक उपस्थित होत्या.
पूरग्रस्त भागात औषधांचा पुरवठा कमी पडु देणार नाही, असे ते म्हणाले. शेतीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत दिली जाईल तसेच पीककर्ज माफ करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले. राष्टीय आपत्ती जाहीर करण्याबाबत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात बोलून निर्णय घेतील. असेही त्यांनी सांगितले.