मुश्रीफ यांना लाख मताधिक्याने निवडून आणू, विरोधकांचे डिपॉझिट जप्त करू; संजय मंडलिक यांचा निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 05:52 PM2024-10-31T17:52:25+5:302024-10-31T17:54:06+5:30

मंडलिक यांना खासदार करणार..

Elect Hasan Mushrif, confiscate the deposits of the opposition says Sanjay Mandalik | मुश्रीफ यांना लाख मताधिक्याने निवडून आणू, विरोधकांचे डिपॉझिट जप्त करू; संजय मंडलिक यांचा निर्धार 

मुश्रीफ यांना लाख मताधिक्याने निवडून आणू, विरोधकांचे डिपॉझिट जप्त करू; संजय मंडलिक यांचा निर्धार 

मुरगुड : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना एक लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आणून विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करू, असा निर्धार माजी खासदार संजय मंडलिक यांनी बुधवारी येथे दिला. मंडलिक गटाच्या वतीने आयोजित भगवा मेळाव्यात ते बोलत होते. मंडलिक आणि मुश्रीफ गट हे एकच कुटुंब असून आमचं आता मनापासून जुळलंय. कुटुंबातील वाद आता मिटलाय, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. मंडलिक म्हणाले, यापूर्वी जे झालं ते झालं. यापुढे आपल्याला एकाच मार्गाने जायचे आहे. महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी मुश्रीफ यांनी संपूर्ण जिल्हाभर लक्ष द्यावे, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची असेल. मुश्रीफ यांना पाठिंबा कसला आम्ही तर घरचेच आहोत. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी रुजविलेल्या पुरोगामीत्वामुळे मुश्रीफ सातत्याने निवडून येतात.

मुश्रीफ म्हणाले, आपल्यातील समज-गैरसमज गंगार्पण करूया. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्यामुळेच माझी राजकीय आणि सामाजिक जडणघडण झाली. त्यांच्या पाऊलखुणांवरूनच आयुष्याची वाटचाल सुरू आहे.

ॲड. वीरेंद्र मंडलिक म्हणाले, मुश्रीफ यांना एक लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू. विकासाचं आणि विचारांचे राजकारण झालं पाहिजे,
कार्यक्रमात जयसिंग भोसले, विजय काळे, अनिल सिद्धेश्वर, प्रदीप चव्हाण, श्रीकांत भोसले, भगवान पाटील, राणाप्रताप सासणे, जीवन साळोखे यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील, केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने, आर. डी. पाटील - कुरुकलीकर, केशवकाका पाटील, शिवानीताई भोसले, आनंदराव फराकटे, एन. एस. चौगुले, रामचंद्र सांगले, विश्वास कुराडे, शहाजी यादव, आप्पासाहेब तांबेकर, नंदकुमार पाटील, बाजार समितीचे संचालक बी. जी. पाटील, नामदेवराव मेंडके, दत्तात्रय मंडलिक आदी प्रमुख उपस्थित होते.

मंडलिक यांना खासदार करणार..

जय-पराजयाची पर्वा न करता लढणे ही सदाशिवराव मंडलिक यांची शिकवण आहे. प्रा. संजय मंडलिक यांनी एखाद्या पराभवाने खचून जाऊ नये, त्यांना पुढच्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आणणे, ही माझी जबाबदारी आहे. ॲड. वीरेंद्र मंडलिक यांचे राजकीय स्वप्न, सामाजिक जीवनातील इच्छा, आकांक्षा यांचा बॅकलॉग भरून काढू.

तळहाताच्या फोडाप्रमाणे..

मंडलिकांच्या कार्यकर्त्यांना मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपेन, असे सांगत मंत्री मुश्रीफ म्हणाले, यांच्यात आणि माझ्यात कधीही अंतर येऊ देणार नाही. गट-तट, पक्ष-पार्टी कधीच कुणाला विचारत नाही. आपल्याकडे आलेला माणूस समाधानाने परत जाईल, यासाठीच मी कार्यरत आहे.

खिमा-चपाती..

वीरेंद्र मंडलिक म्हणाले, लहानपणी शाळेला जाताना सकाळी सहा वाजताच आई डबा करून द्यायची. त्याचवेळी मुश्रीफसाहेब आमच्या घरी यायचे आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक माझ्या आईला सांगायचे की मुश्रीफसाहेब आलेत, त्यांना खिमा-चपाती करून द्या. या धावपळीत माझी आई मला डबा द्यायची विसरून जायची.

Web Title: Elect Hasan Mushrif, confiscate the deposits of the opposition says Sanjay Mandalik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.