काँग्रेसच्या राजकारणातील ‘किंगमेकर’ ठरविणारी निवडणूक

By admin | Published: October 8, 2015 12:17 AM2015-10-08T00:17:16+5:302015-10-08T00:31:41+5:30

सतेज पाटील यांची कसोटी : महापालिकेची सत्ता राखण्याचे आव्हान; नेत्यांची तोेंडे चार दिशेला, पण कार्यकर्त्यांना आधार द्यावा लागणार

The election that decides the 'kingmaker' in Congress politics | काँग्रेसच्या राजकारणातील ‘किंगमेकर’ ठरविणारी निवडणूक

काँग्रेसच्या राजकारणातील ‘किंगमेकर’ ठरविणारी निवडणूक

Next

विश्वास पाटील-- कोल्हापूर महापालिकेच्या या निवडणुकीत सत्ता राखण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे. केंद्रात व राज्यातही आता पक्षाची सत्ता नाही. चार प्रमुख नेत्यांची चार दिशेला तोंडे असताना कार्यकर्त्यांना आधार देत काँग्रेसला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. गतनिवडणुकीत काँग्रेसच्या ३१ जागा निवडून आल्या होत्या व २२ ठिकाणी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर होती. आता हे वैभव राखण्यासाठी काँग्रेसला बरेच झगडावे लागणार आहे.
माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा विधानसभेला पराभव झाला. पाठोपाठ राजाराम कारखाना, ‘गोकुळ’मध्येही त्यांना अपयश आले. जिल्हा बँकेतून त्यांनी स्वत:हून अंग काढून घेतले. बाजारसमितीत त्यांच्या दोन कार्यकर्त्यांना संधी मिळाली. महापालिकेतील सत्ता ही त्यांच्यादृष्टीने महत्त्वाची आणि एकमेव सत्ता आहे. या निवडणुकीत चांगल्या जागा निवडून आल्या तर त्यांना पुन्हा ‘किंगमेकर’ होण्याची संधी आहे. ही संधी मिळणार नाही यासाठी भाजपसह महाडिक गट व ताराराणी आघाडी ताकदीने कामाला लागली आहे. कोल्हापूरच्या राजकारणातील खरा ‘किंगमेकर’ कोण हेच काँग्रेसच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे.
गतनिवडणुकीत तत्कालीन आमदार सतेज पाटील, आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार मालोजीराजे व माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली; परंतु त्यावेळीही नेत्यांत एकवाक्यता नव्हती. त्यामुळे उमदेवारी देताना पायात पाय घालण्याचे व आपल्याच पक्षातील विरोधी नेत्यांचे कार्यकर्ते असलेल्या उमेदवारास ठरवून पाडण्याचे राजकारण खेळले गेले. कसबा बावड्यातील प्रभागात शाहू आघाडीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांवर नजर टाकल्यास हे लक्षात येईल. हे कुरघोडीचे राजकारण उमेदवारी देण्यापासूनच खेळले गेले. राष्ट्रवादी काँग्रेसला सक्षम उमेदवार मिळण्याचे तेच महत्त्वाचे कारण होते. एवढे होऊनही काँग्रेसची निवडणुकीतील कामगिरी सरस राहिली. त्यामागे राज्यातील सत्ता हे देखील तितकेच महत्त्वाचे कारण होते. राज्यात सत्ता असल्याने निधी येईल व शहराचा विकास होईल अशी भावना लोकांत असते. त्याचाही परिणाम मतांवर होतो. ज्यांना कोणीही निवडून आले तर फारसा फरक पडत नाही असा मोठा वर्ग मतदान करताना किमान या पद्धतीने विचार करतो. या निवडणुकीत काँग्रेसच्या मार्गातील हीच सगळ््यात मोठी अडचण आहे. दुसरी अडचण ही की पाच वर्षांत दोन्ही काँग्रेसचीच सत्ता महापालिकेत होती. थेट पाईपलाईन, केशवराव भोसले नाट्यगृहाचा विकास यासारखी शहर विकासावर दूरगामी परिणाम करणारी काही कामे झाली असली तरी दैनंदिन व्यवहारावर, प्रशासनावर फारशी छाप पाडता आलेली नाही. त्यात रस्ते विकास प्रकल्पासारखे वादग्रस्त प्रकरण विधानसभेलाही काँग्रेसला चांगलेच शेकले म्हणजे सत्ता देऊनही लोकांच्या समस्या सोडविण्यात, लोकाभिमुख कारभार करण्यात म्हणावे तसे यश आले नाही. नेत्यांचे ‘व्हीजन’ काय असले तरी महापालिकेचा रोजचा व्यवहार काय अनुभवण्यास येतो हे जास्त महत्त्वाचे असते. त्या पातळीवरही काँग्रेसला मान वर करून सांगता येईल असे ठळक काम दिसत नाही.
या निवडणुकीत आमदार महाडिक यांनी सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या घडामोडीतून अंग काढून घेतले. अंग काढून घेतले असले तरी ते शांत बसलेले नाहीत. ताराराणी आघाडीच्या माध्यमातून ते पडद्याआडून सक्रिय आहेत. युवराज मालोजीराजे हे निवडणुकीत सक्रिय नसले तरी त्यांनी आपल्या शिलेदारांना ताराराणीच्या छावणीत धाडले आहे. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचा तसा शहरातील राजकारणातील वावर मर्यादित आहे. त्यामुळे यावेळेला जी काय लढाई लढायची आहे ती एकट्या सतेज पाटील यांनाच. त्यामुळे उमेदवार निश्चित करण्यापासून प्रचारापर्यंत त्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्याचा एक फायदा असाही आहे की महापालिकेतील जे काही यश असेल ते त्यांच्या प्रयत्नांचे असेल. यश-अपयशाचे तेच धनी असतील. जो काही विरोध असेल तो उघडपणाने असेल. लोकसभा व विधानसभेला काँग्रेसचा हात तेवढा नको, अशी जनभावना झाली होती. त्यास आता वर्ष होऊन गेले आहे. हात बाजूला करून ज्यांना सत्तासूत्रे दिली त्यांच्याकडूनही दोन्ही सरकारच्या पातळीवर सामान्य माणसांच्या जगण्यात म्हणावा तसा बदल झाल्याचा अनुभव नाही. उलट गोरगरिबांच्या अडचणीच सरकारने वाढविल्या आहेत. या सगळ््यांचा परिणाम या मतदानांवर होणार आहे. तो काँग्रेसला उभारी आणणारा असेल की पुन्हा मागे सारणारा, हीच खरी उत्सुकता आहे.


सहा ठिकाणी मानहानी
गतनिवडणुकीवेळी देशात व राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसला सहा प्रभागांत मानहानीकारक पराभवास सामोरे जावे लागले. त्यामध्ये खरी कॉर्नर प्रभागातून चंद्रकांत राऊत यांना अवघी ६८ मते मिळाली. तटाकडील तालीम प्रभागातून लक्ष्मीबाई वाझे यांना कशीबशी १२५, ताराबाई पार्क प्रभागातून गीता संकपाळ यांना १३८, शिवाजी उद्यमनगर प्रभागातून भारती घाटगे यांना १५४, संभाजीनगर बसस्थानक प्रभागात वैशाली महाडिक यांना १६३, पांजरपोळमधून सुभाष जाधव यांना २८५ मते मिळाली.

आठजण ‘ताराराणी’तून
गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हांवर निवडून आलेले आठ नगरसेवक या निवडणुकीत ताराराणी आघाडीकडून रिंगणात आहेत. त्यामध्ये प्रकाश नाईकनवरे व त्यांची सून (पत्नीऐवजी), सत्यजित कदम, किरण शिराळे, रवी इंगवले (आता पत्नी), रणजित परमार (आता भाऊ ईश्वर परमार), राजू घोरपडे (आता पत्नी) आणि राजाराम गायकवाड यांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत पाटोळेवाडी-कदमवाडी प्रभागातून अपक्ष म्हणून रिंगणात असलेले काँग्रेसचे राजसिंह शेळके हे यावेळेला ‘ताराराणी’च्या तंबूत आहेत.

नवखे उमेदवार
काँग्रेसने आतापर्यंत ६९ उमेदवार जाहीर केले आहेत. अजून जिथे जास्त रस्सीखेच आहे, अशा १२ प्रभागांची नावे जाहीर व्हायची आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या यादीवर नजर टाकल्यास काही तगडे उमेदवार निश्चित असले तरी बरेच नवखे उमेदवारही यादीत दिसत आहेत. अशा उमेदवारांना घेऊन लढत देताना काँग्रेसची व नेत्यांचीही चांगलीच कोंडी होणार आहे.

Web Title: The election that decides the 'kingmaker' in Congress politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.