जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक एप्रिलअखेर शक्य-‘वन बार वन व्होट’ प्रस्ताव फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 06:37 PM2019-04-16T18:37:40+5:302019-04-16T18:38:58+5:30
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘वन बार, वन व्होट’ या प्रस्तावाला विरोध करून तो फेटाळण्यात आला. अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘वन बार, वन व्होट’ या प्रस्तावाला विरोध करून तो फेटाळण्यात आला. अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. बार असोसिएशनची निवडणूक एप्रिल महिनाअखेर होण्याची शक्यता असून, त्यासाठी सभेत अॅड. सुभाष पिसाळ यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
येथील न्यायसंकुलातील जिल्हा बार असोसिएशनच्या सभागृहात मंगळवारी ही सभा घेण्यात आली. २०१९-२० या वर्षासाठी पदाधिकारी निवडीसाठी तसेच ‘वन बार, वन व्होट’ या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी ही सभा आयोजित केली होती.
या सभेमध्ये २०१८-१९ या वर्षातील जमाखर्चाला मंजुरी देण्यात आली. या वर्षात बार असोसिएशनला सुमारे १३ लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस यांनी यावेळी दिली. ‘वन बार, वन व्होट’ ही योजना वकिलांच्या एकीला हानिकारक व खंडपीठाच्या चळवळीला मारक असल्याने तिला सभेत विरोध केला. सभेमध्ये नवीन पदाधिकारी निवडीबाबत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. सुभाष पिसाळ व सहायक म्हणून अॅड. ए. एस. देसाई यांची निवड करण्यात आली. या महिनाअखेर निवडणुकीची तारीख निश्चित होणार असून ती येत्या दोन दिवसांत अॅड. पिसाळ जाहीर करण्याची शक्यता आहे.
या सभेमध्ये अॅड. विजय पाटील-उत्तरेकर, अॅड. किरण पाटील, अॅड. कोमल राणे, अॅड. राजेंद्र मंडलिक, इचलकरंजी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. विवेक तांबे, राधानगरीचे अॅड. एच. आर. हलके यांनी आपले विचार मांडले.
यावेळी उपाध्यक्ष आनंदराव जाधव, सेक्रेटरी सुशांत गुडाळकर, जॉ. सेक्रेटरी तेजस नदाफ, लोकल आॅडिटर धैर्यशील पवार, महिला प्रतिनिधी मनीषा पाटील, सदस्य ओंकार देशपांडे, अभिषेक देवरे, संजय मुळे, युवराज शेळके, जयदीप कदम, आदी उपस्थित होते.
प्रथमच कार्यकारिणीचे अभिनंदन
विद्यमान अध्यक्ष व कार्यकारिणीने गेल्या दहा महिन्यांत चांगले काम केल्याबद्दल अॅड. विवेक घाटगे यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला अॅड. महादेवराव आडगुळे यांनी अनुमोदन केले. बार असोसिएशनच्या इतिहासात प्रथमच असा अभिनंदनाचा ठराव सर्वसाधारण सभेत करण्यात आला.
खंडपीठाबाबत चर्चा करण्यासाठी उच्च न्यायालयाचे नूतन न्यायमूर्ती प्रदीप नांद्राजोग यांच्याकडे भेटीबाबत पत्रव्यवहार केला असून, २७ एप्रिलपर्यंत बैठकीची तारीख व वेळ निश्चित होईल.
- अॅड. प्रशांत चिटणीस, अध्यक्ष, जिल्हा बार असोसिएशन