गडहिंग्लज कारखान्याची निवडणूक मार्चमध्ये !
By Admin | Published: December 11, 2015 12:38 AM2015-12-11T00:38:29+5:302015-12-11T00:50:39+5:30
जानेवारीअखेर मतदार यादी : मतदारांच्या ठराव मागणीचा कार्यक्रम जाहीर
गडहिंग्लज : हरळी (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या सहकारी संस्था मतदारांच्या ठराव मागणीचा कार्यक्रम जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक साखर सहसंचालकांनी प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार या कारखान्याची निवडणूक मार्च २०१६ मध्ये होण्याची शक्यता आहे.
८ जानेवारीपर्यंत सहकारी संस्था मतदारांचे ठराव, तर त्याच तारखेपर्यंतच्या व्यक्ती सभासदांची यादीही कारखान्याकडून मागविण्यात आली आहे. त्यानंतर कच्ची मतदार यादी प्रसिद्धी आणि त्यावरील हरकती व सुनावणी होईल.
येत्या जानेवारीअखेर पक्की मतदारयादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ४५ दिवसांनी म्हणजेच मार्चमध्ये कारखान्याची निवडणूक होण्याची शक्यता आहे. १५ डिसेंबर २०१२ पर्यंतचे संस्था सभासद व १५ डिसेंबर २०१३ पर्यंतचे व्यक्ती सभासदच मतदारयादीत समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक गटातील २४,५०० व्यक्ती सभासद व १९८ संस्था मतदार या निवडणुकीसाठी पात्र होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन वर्षांपासून हा कारखाना पुण्याच्या ब्रीक्स् फॅसिलिटीज कंपनीला चालवायला दिला आहे. तेव्हापासून तत्कालीन अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे आणि विद्यमान उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे.
गत निवडणुकीत तत्कालीन अध्यक्ष अॅड. शिंदे व उपाध्यक्ष चव्हाण आणि हत्तरकी गट यांची सत्ताधारी आघाडी विरुद्ध तत्कालीन विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर व आमदार हसन मुश्रीफ, कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर व संग्रामसिंह नलवडे गट यांच्या आघाडीत दुरंगी सामना झाला होता. त्यात शिंदे-चव्हाण यांनी बाजी मारली होती. आता दोघेही एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळेच या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.