निवडणूक ‘गोकुळ’ची, चर्चा पन्हाळ्याच्या राजकारणाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:20 AM2021-04-03T04:20:31+5:302021-04-03T04:20:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, पोर्ले तर्फ ठाणे : आमदारकी, खासदारकी नको; पण ‘गोकुळ’चे तिकीट पाहिजे, अशी चर्चा असणाऱ्या ‘गोकुळ’च्या ...

Election of Gokul, discussion of Panhala politics | निवडणूक ‘गोकुळ’ची, चर्चा पन्हाळ्याच्या राजकारणाची

निवडणूक ‘गोकुळ’ची, चर्चा पन्हाळ्याच्या राजकारणाची

Next

लोकमत न्यूज नेटवर्क,

पोर्ले तर्फ ठाणे : आमदारकी, खासदारकी नको; पण ‘गोकुळ’चे तिकीट पाहिजे, अशी चर्चा असणाऱ्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीमुळे जिल्ह्यात राजकीय धुळवड सुरू आहे. निवडणूक ‘गोकुळ’ची असली तरी, निवडणुकीसाठी इच्छुकांची रस्सीखेच आणि सत्तेसाठी गटनेत्यांची खांदेपालट यामुळे पन्हाळा तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. नेत्यांनी कोणासोबत जायचं आणि कोणाला पाठिंबा द्यायचा, हे कार्यकर्त्यांनी नेत्यांना शिकविण्याची वेळ या निवडणुकीमुळे आली आहे. केवळ विनय कोरे यांना राजकीय विरोध म्हणून शिवसैनिकांनी दाखवलेल्या धाडसी निर्णयामुळे तालुक्यात चांगलीच रंगत आली आहे.

विरोधकांनी आबाजी आणि आबांना फोडून सत्तारूढ गटाला धक्का दिला होता. दरम्यान, डाॅ. विनय कोरे यांनाही दोन्ही गटाकडून ऑफर असताना दूध संघाचा प्रतिस्पर्धी म्हणून की काय, कोरे विरोधी गटात सामिल झाले. दरम्यान, पन्हाळा तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. विरोधी गटात कोरेंचा प्रवेश कट्टर शिवसैनिकांच्या पचनी पडला नाही. गेली दहा वर्षे सत्तेचे मीठ चाखून सत्तारूढ गटाची जाण नसलेल्या आबांना पन्हाळ्यातील शिवसैनिकांनी बैठक घेऊन “स्वाभिमान” शिकविला. केवळ विनय कोरे यांना राजकीय विरोध म्हणून सत्यजित पाटील यांना सत्तारूढ गटात सामिल होण्यास कार्यकर्त्यांनी भाग पाडल्यामुळे, पुढील राजकीय धोरणाच्यादृष्टीने कार्यकर्त्यांचा निर्णय शहाणपणाचा असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. विधानसभेचा पैरा फेडण्यासाठी विनय कोरे यांनी शाहुवाडीतून करण गायकवाड, तर पन्हाळ्यातून अमर पाटील यांना उमेदवारी मागितली आहे. आसुर्लेचे माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत जनसुराज्य पक्षामधून गोकुळसाठी इच्छुक असताना, त्यांच्या उमेदवारीला कात्री लागल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांतून नाराजीचा सूर येत आहे.

चंद्रदीप नरकेंच्या राजकीय वाटचालीत सतत धर्मसंकटात सापडणाऱे अरुण नरके यांनी चेतन नरके यांना निवडणुकीत उतरवून नरके घराण्याच्या नव्या राजकीय वाटचालीचा श्रीगणेशा सुरू केला आहे. अरुण नरके यांनी पक्षीय निष्ठा बाजूला ठेवून चंद्रदीप नरकेंची राजकीय जडणघडण केली. यावेळच्या विधानसभेत सतेज पाटील यांनी काँग्रेस एकनिष्ठ राहून काम केल्याने त्याचा फटका चंद्रदीप नरकेंना विधानसभेत बसला होता. तरी सुध्दा चंद्रदीप नरके यांनी चेतन नरके यांच्याविरोधात बंधू अजित नरके यांना उतरवून अरुण नरके यांना सरळ विरोध केला. गोकुळच्या मलईसाठी, की राजकीय अस्तित्वासाठी राजकारणातील घराणेशाही आणि वतनदारीचा शिरकाव कट्टर कार्यकर्त्यांना खुजा करणारा ठरत आहे. सोयीच्या राजकारणासाठी नेत्यांच्या सुरू असलेल्या राजकीय खेळींवर सर्वसामान्य जनता लक्ष ठेवून आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

Web Title: Election of Gokul, discussion of Panhala politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.