गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार, विभागीय उपनिबंधकांचे स्पष्टीकरण : हरकतींची सुनावणी मंगळवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:37 AM2021-02-26T04:37:44+5:302021-02-26T04:37:44+5:30
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार की नाही, यावरून संभ्रमावस्था असताना गुरुवारी उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार संघाची निवडणूक ...
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार की नाही, यावरून संभ्रमावस्था असताना गुरुवारी उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहील, असे विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी स्पष्ट केले. प्रारूप मतदार यादीवरील हरकतींची सुनावणी मंगळवार (दि. २ मार्च) पासून होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोल्हापुरातील बहुचर्चित ‘गोकुळ’सह जिल्हा बँक व साखर कारखान्याच्या निवडणुकांनाही स्थगिती आली. १ एप्रिलपासून स्थगित झालेल्या टप्प्यापासून निवडणुकीची प्रकिया सुरू होईल, असे सांगण्यात आले. तथापि, गुरुवारी यावरून संभ्रम निर्माण झाल्याने विभागीय उपनिबंधक शिरापूरकर यांनी निवडणूक प्राधिकरणाकडे मार्गदर्शनही मागवले; परंतु नंतर त्यांनीच ही निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट करून त्यातील संदिग्धता दूर केली.
उच्च न्यायालयाने १० फेब्रुवारीला दिलेल्या आदेशात गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १५ फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रियाही सुरू झाली. प्रारूप याद्यावरील आक्षेप घेण्याची मुदत संपल्याच्या दिवशीच पुन्हा एकदा स्थगितीचा आदेश आला.
केर्ली (ता. करवीर) येथील ज्योतिर्लिंग सहकारी दूध संस्थेने गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या सुनावणीवर निर्णय देताना गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचाच आधार घेऊन ही प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात येते; परंतु हा निर्णय सत्तारूढ गटाला कितपत मान्य होतो याबद्दल साशंकता असून त्यावरून पुन्हा न्यायालयीन लढाई होते की काय, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. कोरोनाची लाट कितपत नियंत्रणात राहते हे देखील निवडणूक होण्याच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे.