‘गोकुळ’च्या निवडणुकीत ऐतिहासिक परिवर्तन होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:21 AM2021-04-26T04:21:59+5:302021-04-26T04:21:59+5:30
आजरा : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सत्तारूढ गटाच्या विरोधात जिल्ह्यात लाट तयार झाली आहे. त्यामुळे २ मे रोजी होणाऱ्या मतदानात ऐतिहासिक ...
आजरा : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सत्तारूढ गटाच्या विरोधात जिल्ह्यात लाट तयार झाली आहे. त्यामुळे २ मे रोजी होणाऱ्या मतदानात ऐतिहासिक सत्ता परिवर्तन होईल, असा विश्वास आजरा भुदरगड- राधानगरीचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी व्यक्त केला. ते आजऱ्यातील राजश्री शाहू आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते.
पाच दिवसांत महाडिकांच्या टँकरचे बिल व दहा दिवसांनी शेतकऱ्याचे बिल ही फसवणूक थांबवण्यासाठी विरोधी शाहू आघाडी तयार केली आहे. दूध उत्पादकांना चांगला दर मिळालाच पाहिजे, यासाठी शाहू आघाडी कटिबद्ध आहे, असे सतेज पाटील यांनी सांगून माजी आमदार महादेव महाडिक यांच्यावर जोरदार टीका केली.
दूध उत्पादकांनी ‘गोकुळ’मधला भ्रष्टाचार व चाललेली लूट थांबवायची असेल, तर एकदा संधी द्या. दूध दरवाढीसह पशुखाद्य चांगले देऊन उत्पादकांना चांगला दर देण्याचे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी केले.
‘गोकुळ’चे निवडणुकीबाबतचे पोटनियम दुरुस्त केले जातील व सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल, असे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.
यावेळी उमेदवार अरुण डोंगळे, अंजना रेडेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले.
मेळाव्याला तालुका संघाचे अध्यक्ष एम.के. देसाई, साखर कारखाना अध्यक्ष सुनील शिंत्रे, संचालक विष्णुपंत केसरकर, वसंतराव धुरे, सुधीर देसाई, सभापती उदय, पवार माजी संचालक अल्बर्ट डिसोझा यासह खासदार संजय मंडलिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, के.पी. पाटील, विश्वनाथ कुंभार सर्व उमेदवार उपस्थित होते.
-------------------------
आजऱ्यातील तीन गटांचे मेळावे
आजऱ्यात शाहू आघाडीला पाठिंबा देण्यासाठी तीन मेळावे झाले. शिंपी गट, चराटी गट व राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना पक्षांनी एकत्र येऊन एक मेळावा झाला. याची चर्चा सभेपूर्वी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. याबाबत मुश्रीफ यांनी भाषणात सर्व जण शाहू आघाडीसोबत असल्याचा खुलासा केला.
--------------------
नाहीतर वेगळा विचार
आजरा, गडहिंग्लज व चंदगड, येथे म्हशीचे दूध मोठ्या प्रमाणात आहे; पण उमेदवारी देताना अन्याय होतो. नाराजी वाढते. पुढीलवेळी या विभागाला सहा उमेदवारी मिळाल्या नाहीत, तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा आमदार राजेश पाटील यांनी नेत्यांना दिला.
-----
फोटो ओळी : आजऱ्यातील मेळाव्यात आमदार प्रकाश आबीटकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विश्वास पाटील, सतेज पाटील, हसन मुश्रीफ आदी उपस्थित होते.
क्रमांक : २५०४२०२१-गड-०६