मी पाहिलेली निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:27 AM2019-04-12T00:27:28+5:302019-04-12T00:27:36+5:30
स्व. बाळासाहेब माने १९७० मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते खासदार झाले. या कालावधीनंतरच्या प्रत्येक निवडणुकीच्या ...
स्व. बाळासाहेब माने १९७० मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते खासदार झाले. या कालावधीनंतरच्या प्रत्येक निवडणुकीच्या काळात सध्यासारखे तणावाचे किंवा गटा-तटाचे राजकारण म्हणावे तसे नव्हते. एकमेकांची उणीदुणी काढण्याचे प्रमाण अत्यल्प होते. स्वत:च्या मतदारसंघात लोकोपयोगी कामे केल्याने खालील स्तरावरील मतदार खूश असायचे. मतदारांच्या समाधानाच्या भांडवलामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्येही ते यशस्वी झाले. त्यांच्या मतदारसंघातील कोणताही सुशिक्षित किंवा अशिक्षित मतदार एखादे काम घेऊन त्यांच्याकडे गेला व भेटायला आलेल्या मतदारावर खरोखरच अन्याय झाल्याची स्व. बाळासाहेब माने यांची खात्री झाली की ते टेबलावरील लँडलाईनवर (त्यावेळी मोबाईल नव्हते) शासकीय खात्यातील संबंधित ‘साहेबा’स ते कडक शब्दांत आदेश देत असत व खरोखरच काम ताबडतोब होत असे. अशा प्रकारचे काम घेऊन गेलेल्या अनेक नागरिकांची कामे तत्काळ झाल्याने संबंधित व्यक्ती व त्यांच्या घरातील मतदार माने यांच्या प्रचारासाठी पुढाकार घ्यायचे. गरजू मतदारांची कामे करणे या एकाच भांडवलावर त्यांनी पुढील निवडणुकीतही यश संपादन केले होते. निवडणूकपूर्व प्रचारात त्यावेळी सर्व स्तरांवरील मतदार मतदारसंघातील खेडी वाटून घेऊन स्वत:च्या घरातील भाकरी व खर्डा/चटणी बांधून घेऊन सकाळपासून सायंकाळपर्यंत बाहेरच असायचे. प्रचारावेळी जेवणाची वेळ झाली की, एखादी बाग किंवा निवाऱ्याची जागा दिसल्यास त्याठिकाणी सर्वजण जमिनीवर एकत्र बसून वनभोजन करत असत व अत्यल्प विश्रांतीनंतर पुन्हा हिरीरीने प्रचाराच्या रणधुमाळीत रममाण होत असायचे. आतासारखी त्यावेळी मोटारसायकली किंवा चारचाकी वाहने बोटावर मोजण्यासारखीच असत. सध्या मोटारसायकलींमध्ये पेट्रोल घालण्यासाठीचे व हॉटेल किंवा ढाब्यांमध्ये जेवणासाठीचे शिक्के मारलेले पासेस देण्याच्या पद्धतीची गरजही नसायची. काहीही खर्च न करता मतदारसंघातील प्रत्येक मतदाराच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे पुढारी भविष्यात पुढे येतील याची आपण सर्वांनी वाट पाहूया.
- ए. जी. पलसे, जयसिंगपूर