‘करवीर नगर वाचन मंदिर’ची निवडणूक जाहीर

By Admin | Published: May 6, 2016 11:57 PM2016-05-06T23:57:26+5:302016-05-07T00:57:37+5:30

इच्छुकांची तयारी सुरू : मंगळवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया; ५ जूनला मतदान

Election of 'Karveer Nagar Reading Temple' was announced | ‘करवीर नगर वाचन मंदिर’ची निवडणूक जाहीर

‘करवीर नगर वाचन मंदिर’ची निवडणूक जाहीर

googlenewsNext

कोल्हापूर : स्थापनेची १६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या आणि कोल्हापुराच्या वाचनसंस्कृतीचा मानदंड असलेल्या करवीर नगर वाचन मंदिरा (कनवा)ची निवडणूक जाहीर झाली आहे. ‘कनवा’च्या सन २०१६-२०२१ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवार (दि. १०) ते गुरुवार (दि. १२) पर्यंत आहे. या निवडणुकीत सुमारे २२०० सभासद मतदानासाठी पात्र आहेत. काही इच्छुक सभासदांकडून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू झाली आहे.
संपूर्ण संगणकीकृत, १ लाख ३ हजार पुस्तके, राज्य शासनाचा ‘अ’ वर्गाचा दर्जा, दुर्मीळ ग्रंथ व हस्तलिखितांचे डिजिटायझेशन, अंधांसाठी ब्रेल लिपीतील साहित्य आणि मोफत अभ्यासिका, आदी स्वरूपांतील ‘कनवा’ची वैशिष्ट्ये आहेत. या संस्थेचे सध्या एकूण ४००० सभासद आहेत. यांतील ७५० आजीव, तर ३२५० हे सामान्य सभासद आहेत. यांतील २२०० सभासद हे मतदानासाठी पात्र आहेत. संस्थेची १५ जणांची कार्यकारिणी आहे. या सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, अंतर्गत हिशेब तपासनीस, कार्याध्यक्ष, उपकार्याध्यक्ष, कार्यवाह, सहकार्यवाह व अन्य आठ संचालक यांचा समावेश आहे. त्यासह आजीव सभासद, महिला सभासद, साहित्यिक यांच्यातील प्रत्येकी एका प्रतिनिधीचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. अभिजित देसाई हे काम पाहत आहेत. दरम्यान, या निवडणुकीसाठी काही सभासदांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मतदार यादी मिळविण्यासह उमेदवार निवडण्यासाठी त्यांची चाचपणी सुरू आहे. त्याचप्रमाणे विद्यमान संचालकांकडूनही निवडणुकीची तयारी सुरू आहे. या संस्थेची आतापर्यंत अधिकतर वेळा निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र,
यावेळी निवडणूक लागण्याची शक्यता काही सभासदांकडून व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास २५ वर्षांनंतर या संस्थेची निवडणूक रंगणार आहे. (प्रतिनिधी)


मतदार पात्रतेसाठी हे आवश्यक
ज्या सभासदांकडे पुस्तकांची बाकी नाही, तीन वर्षांत सातत्याने सभासद आहेत; शिवाय दि. ३० एप्रिल पूर्ण वर्गणी भरलेली आहे, असे सभासद निवडणुकीत मतदानासाठी पात्र ठरणार आहेत.

वादाचे पडसाद निवडणुकीत
करवीर नगर वाचन मंदिराचे शाहूकालीन शिवाजी सभागृह पाडल्याचा राग तसेच अंबाबाई मंदिरातील गाभारा प्रवेशानंतरचे राजकारण या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. या संस्थेत आता मराठा समाजाचेही पॅनेल उभे करण्याची तयारी सुरु असून निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता यामुळे मावळलेली आहे.

विद्यमान पदाधिकारी
राजाभाऊ जोशी (अध्यक्ष), विकास परांजपे (अंतर्गत हिशेब तपासनीस), अनिल वेल्हाळ (कार्याध्यक्ष), श्रीकृष्ण साळोखे (उपकार्याध्यक्ष), अभिजित भोसले (कार्यवाह), उदय सांगवडेकर (सहकार्यवाह).

Web Title: Election of 'Karveer Nagar Reading Temple' was announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.