करवीर पंचायत सभापतीची २२ फेब्रुवारीला निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:25 AM2021-02-11T04:25:12+5:302021-02-11T04:25:12+5:30
कसबा बावडा : करवीर पंचायत समिती सभापतिपदाची निवड सोमवारी (दि. २२) दुपारी दोन वाजता पंचायत समितीच्या सभागृहात होणार आहे. ...
कसबा बावडा :
करवीर पंचायत समिती सभापतिपदाची निवड सोमवारी (दि. २२) दुपारी दोन वाजता पंचायत समितीच्या सभागृहात होणार आहे. करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होणार आहे. या निवडीबाबतचे आदेश नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पंचायत समितीला प्राप्त झाले आहेत. विद्यमान सभापती अश्विनी कृष्णा धोत्रे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.
करवीर पंचायत समितीवर पालकमंत्री सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील गटाची सत्ता आहे. नेत्यांनी ठरवून दिलेला सव्वा वर्षाचा कार्यकाल संपला असल्याने अश्विनी धोत्रे यांनी राजीनामा दिला होता. आता या पदासाठी सतेज पाटील गटाच्या मीनाक्षी भगवान पाटील (कळंबा) व मंगल आनंदराव पाटील (नेर्ली) त्या दोघींपैकी एकास संधी मिळणार आहे.
सभापती पदाकरता नामनिर्देशनपत्र सोमवारी (दि.२२) सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत भरावयाचे आहे. लगेचच त्या अर्जाची छाननी होऊन अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. सभापतिपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आहे.
दरम्यान, सद्या उपसभापतीचे प्रभारी सभापती म्हणून कार्यरत असलेले सुनील पोवार हे त्याच दिवशी नूतन सभापतींकडे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यानंतर आठवडाभरात नवीन उपसभापती पदाची निवड होईल.