Kolhapur News: राजाराम कारखान्याची २० मार्चपासून रणधुमाळी?, १३ हजार ५३८ सभासदांची अंतिम यादी प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 12:59 PM2023-03-09T12:59:19+5:302023-03-09T12:59:44+5:30
विरोधी गटाने घेतलेल्या सर्वच हरकती फेटाळून लावल्या
कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यांची प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांनी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये १३ हजार ४०९ व्यक्ती सभासद तर १२९ संस्था सभासदांचा समावेश आहे. २० मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होऊन २३ एप्रिलला मतदान होण्याची शक्यता आहे.
‘राजाराम’ कारखान्याच्या प्रारुप यादीवर हरकती व सुनावणीची प्रक्रिया मंगळवारी पार पडली. त्यानुसार विरोधी गटाने घेतलेल्या सर्वच हरकती फेटाळून लावल्या. प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांनी १३ हजार ४०९ व्यक्ती सभासद व १२९ संस्था सभासदांची यादी बुधवारी प्रसिद्ध केली. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दहा दिवसांच्या पुढे व वीस दिवसांच्या आत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविता येते.
सहसंचालक कार्यालयातील हालचाली पाहता तातडीने निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानुसार २० मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. छाननी, माघारीची प्रक्रिया पाहता साधारणता २३ एप्रिलला मतदान होऊन २५ एप्रिलला मतमोजणी होऊ शकते.
नीलकंठ करे निवडणूक निर्णय अधिकारी?
‘राजाराम’ साखर कारखान्याची निवडणूक संवेदनशील असल्याने ती महसूल यंत्रणेकडे द्यावी, असा प्रयत्न आहे. त्यातूनच करवीरचे प्रातांधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्याची चर्चा आहे. मात्र गेल्या दोन दिवसांतील हालचाली पाहता जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियु्क्ती होण्याची शक्यता आहे.
असा राहू शकतो निवडणूक कार्यक्रम :
उमेदवारी अर्ज दाखल : २० ते २७ मार्च
छाननी : २८ मार्च
माघारीची मुदत : २९ मार्च ते ११ एप्रिल
मतदान : २३ एप्रिल
मतमोजणी : २५ एप्रिल