कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक एकतर्फी की, चुरशीची ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:12 AM2018-12-05T00:12:08+5:302018-12-05T00:12:18+5:30
कोल्हापूर : महापौर-उपमहापौर कोण होणार, निवडणूक चुरशीची होणार की एकतर्फी, शिवसेनेचे चार नगरसेवक आपली मते कोणाच्या पारड्यात टाकणार, या ...
कोल्हापूर : महापौर-उपमहापौर कोण होणार, निवडणूक चुरशीची होणार की एकतर्फी, शिवसेनेचे चार नगरसेवक आपली मते कोणाच्या पारड्यात टाकणार, या प्रश्नांची उत्तरे आज, बुधवारी सायंकाळी मिळणार आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून महापौरपदाचे उमेदवार म्हणून कोणाचे नाव जाहीर होणार यावर चुरस स्पष्ट होईल; तसेच पुढील घडामोडी घडतील. त्यामुळे निवडणुकीत काय होणार, याकडे मनपा वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक सोमवारी (दि. १०) होत असून त्याकरिता आज, बुधवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. पक्षीय बलाबल पाहता महापौर, उपमहापौर कॉँग्रेस-राष्टÑवादीचे होतील, यात शंकाच वाटत नाही; परंतु या दोन्ही पदांसाठी पक्षांतर्गत चुरस आणि संघर्ष उफाळून आला असल्यामुळे, उमेदवारी कोणाला मिळते यावरच बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. पक्षात या पदासाठी चार-चार उमेदवार इच्छुक असल्याने चुरस वाढली आहे. कोणाला तरी एकाला उमेदवारी मिळाल्यावर बाकीच्यांची समजूत कशी काढायची, हाच पक्षनेत्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी राष्टÑवादीकडे महापौरपद राहणार असून पक्षाकडून अॅड. सूरमंजिरी राजेश लाटकर, सरिता नंदकुमार मोरे, माधव प्रकाश गवंडी, अनुराधा सचिन खेडकर यांनी आग्रही दावा केला आहे. राष्टÑवादीत सहा-सहा महिने महापौर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यात लाटकर आणि मोरे आघाडीवर आहेत. पहिल्यांदा आपल्या नावाचा विचार करावा, असा दोघींचा हट्ट आहे. माधवी गवंडी यांना तीन महिन्यांकरिता का होईना, महापौर करणार असा शब्द नेत्यांनी दिल्याचीही चर्चा आहे.
उपमहापौरपद यावेळी कॉँग्रेसकडे राहणार आहे. सोमवार (दि. १०) पर्यंत कॉँग्रेसकडून अशोक जाधव, भूपाल शेटे, श्रावण फडतारे यांची नावे आघाडीवर होती. या यादीत संजय मोहिते, शोभा कवाळे, वृषाली कदम यांचाही समावेश झाल्यामुळे कॉँग्रेसमध्येही संघर्ष असल्याचे स्पष्ट होत आहे. भूपाल शेटे, संजय मोहिते यांना स्थायी समिती सभापतिपद पाहिजे आहे; परंतु सोमवारी (दि. ३) आमदार सतेज पाटील यांनी मोहिते, शेटे उपमहापौरपदाचे दावेदार असल्याचे सांगून गोंधळ उडवून दिला. आमदार पाटील यांनी उपमहापौरपदाचा कार्यकाळ वर्षासाठी असेल असे सांगितल्याने या पदावर ज्येष्ठ नगरसेवकाची निवड होण्याची शक्यता दिसते. जाधव, शेटे, मोहिते यांच्यात ही चुरस राहील.
भाजप-ताराराणीचे लक्ष कॉँग्रेस-राष्टÑवादीतील घडामोडींवर
महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक अगदी तोंडावर आली असतानाही भाजप-ताराराणी आघाडीत फारशा हालचाली दिसत नाहीत. त्यांच्या आघाडीच्या नेत्यांचे व कारभाºयांचे सगळे लक्ष कॉँग्रेस-राष्टÑवादीतील घडामोडींवर खिळून राहिले आहे. काहीतरी अनपेक्षित घडामोडी घडतील, कॉँग्रेस-राष्टÑवादीत कलह निर्माण होईल आणि त्यातून आठ-नऊ नगरसेवक बाहेर पडतील, अशा काल्पनिक आशावादावर ही मंडळी विसंबून आहेत; परंतु त्यांचा आशावाद किती प्रबळ आहे, हे आज, बुधवारी सायंकाळी स्पष्ट होईल. दरम्यान, भाजप-ताराराणी आघाडीने नेहमीप्रमाणे आपला ‘ए प्लॅन’ तयार ठेवला आहे. त्यांच्याकडे दुसरा ‘बी प्लॅन’ही तयार आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीत बंडाळी माजलीच तर हा दुसरा ‘बी प्लॅन’च्या अंमलबजावणीकरिता यंत्रणा तयार ठेवली आहे. त्यासाठी काही असंतुष्ट नगरसेवकांशी त्यांच्या यापूर्वी चर्चाही झालेल्या आहेत. या आघाडीकडून महापौरपदासाठी सविता भालकर, उमा इंगळे यांची नावे चर्चेत आहे. कॉँग्रेस आघाडीत फाटाफूट झालीच तर ‘बी प्लॅन’च स्वीकारला जाईल. त्याप्रमाणे महापौरपदाच्या उमेदवार जयश्री जाधव या असतील. निवडणूक जिंकण्याची आशा असेल तरच जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे.
सूरमंजिरी लाटकर
यांची जमेची बाजू
सूरमंजिरी यांचे पती राजेश हे हसन मुश्रीफ यांचे कट्टर कार्यकर्ते.
स्वत: सूरमंजिरी या उच्च विद्याविभूषित असून, वकील आहेत.
महापालिकेचा अभ्यास, कायद्याचे ज्ञान, संभाषण कौशल्य.
सरिता मोरे यांची जमेची बाजू
राष्टÑवादीकडून निवडणूक लढतानाच नेत्यांकडून पदाधिकारी करण्याचे आश्वासन.
सरिता मोरे या दुसºयांदा महापालिकेत निवडून गेल्या असून, त्यांची ज्येष्ठता स्पष्ट.
मोरे यांच्या बाजूने राष्टÑवादीतील सात ते आठ नगरसेवकांकडून आग्रह धरला आहे.