आजऱ्यातील १२० संस्थांच्या सभासदांना निवडणुकीचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:20 AM2020-12-23T04:20:25+5:302020-12-23T04:20:25+5:30
सदाशिव मोरे। आजरा : आजरा तालुक्यातल १२० सहकारी संस्थांची पंचवार्षिक मुदत संपली आहे. शासनाने दोनवेळा मुदतवाढ दिली आहे. आणखीन ...
सदाशिव मोरे।
आजरा : आजरा तालुक्यातल १२० सहकारी संस्थांची पंचवार्षिक मुदत संपली आहे. शासनाने दोनवेळा मुदतवाढ दिली आहे. आणखीन मुदतवाढ मिळणार की निवडणुका होणार याबाबत कट्टयावरील चर्चेला उधाण आले आहे. पण, सभासदांना या संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वेध लागले आहेत.
गेल्या मार्चपासून मुदत संपलेल्या एकाही सहकारी संस्थेची कोरोनामुळे निवडणूक झालेली नाही. पाच वर्षांतून एकदा निवडणुकीला उभे राहून सभासदांमधून लोकमत आजमावयाचे असते. पण, निवडणुकाच झालेल्या नसल्यामुळे अनेक इच्छुक सभासदांचा हिरमूड झाला आहे. कोरोनामुळे थांबलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. १५ जानेवारीनंतर पहिल्या टप्प्यातील कांही संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे समजते.
आजरा तालुका खरेदी विक्री-संघ, अण्णा-भाऊ आजरा तालुका सूतगिरणीसह ५४ विकास सेवा संस्था, ४२ सहकारी पतसंस्था, ८ नवीन संस्था, २ ग्राहक संस्था, ८ सेवक पतसंस्था, मजूर व पाणी पुरवठा संस्था प्रत्येकी १ अशा १२० सहकारी संस्था निवडणुकीसाठी पात्र आहेत. तालुका संघासाठी १९, तर सूतगिरणीसाठी १७, तर अन्य संस्थांचे ११ संचालक निवडून द्यावयाचे आहेत. सूतगिरणीची मुदत २६ मार्चला, तर तालुका संघाची मुदत २ ऑगस्टला संपली आहे.
--------------------------
* ग्रामपंचायतीपाठोपाठ सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहेत. त्यामुळे नवीन वर्ष निवडणुकीसाठी जाणार आहे. गावपातळीवरील विकास सेवा व पतसंस्थांच्या निवडणुका होणार असल्याने गावा-गावांतील राजकारण ढवळून निघणार आहे.
* तालुक्यातील मुदत संपलेल्या ''''अ'''' वर्ग - १, ''''ब'''' वर्ग ५७, ''''क'''' वर्ग ५३, ''''ड'''' वर्ग ९ अशा एकूण १२० सहकारी संस्था आहेत. ग्रामीण भागातील राजकारण व सहकारी संस्थांवर अवलंबून असते. त्यांच्याच निवडणुका होणार असल्याने इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.