निवडणुकीआधीचे मंत्रिपद धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:57 AM2019-02-11T00:57:41+5:302019-02-11T00:57:47+5:30

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : निवडणूक लोकसभेची असो की विधानसभेची; त्यामध्ये निवडून येण्याअगोदरच मंत्रिपदाची चर्चा होणे ...

Before the election, the minister is dangerous | निवडणुकीआधीचे मंत्रिपद धोकादायक

निवडणुकीआधीचे मंत्रिपद धोकादायक

Next

विश्वास पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : निवडणूक लोकसभेची असो की विधानसभेची; त्यामध्ये निवडून येण्याअगोदरच मंत्रिपदाची चर्चा होणे जिल्ह्याच्या राजकारणात अनेकांना धोक्याचे ठरले आहे. त्यातून पक्षांतर्गत विरोधक जागे होतात आणि हा आपल्यापेक्षा मोठा होतोय का, या मानसिकतेतून पायात पाय घालण्याचे राजकारण जोमाने होत असल्याचा इतिहास आहे.
‘क्रिडाई कोल्हापूर’तर्फे आयोजित ‘दालन’ गृह प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. ८) खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाले. त्या समारंभात उद्योजक राजू परीख यांनी खासदार महाडिक यांनी ‘पुढील वेळी मंत्री होऊन यावे,’ अशा भावना व्यक्त केल्या. ‘तुम्हा सर्वांची साथ व पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे पाठबळ मिळाले तर मंत्री म्हणूनच पुढील वेळी नक्की येईन,’ असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. काही महिन्यांपूर्वी भाजपचे नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही खासदार महाडिक यांना ‘तुम्ही भाजपमध्ये आला तर केंद्रात मंत्रिपद देण्या’ची आॅफर दिली होती. देशात सध्या भाजपविरोधी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यास त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. विविध सर्वेक्षणात राष्ट्रवादीचे नऊ खासदार निवडून येतील, असे अंदाज व्यक्त होत आहेत. महाडिक यांचा संसदीय कामकाजातील प्रभाव, त्यांचे पक्षाध्यक्ष पवार यांच्याशी असलेले चांगले संबंध यांमुळे त्यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. तिथेही पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे हे मंत्रिपदाच्या स्पर्धेत असतील; परंतु त्यासाठी महाडिक यांना खासदारकीचे आव्हान अगोदर पेलावे लागेल.
जिल्ह्याच्या राजकारणात यापूर्वी १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत मुरगूडला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची सभा झाली. त्यामध्ये त्यांनी ‘विक्रमसिंह घाटगे यांना फक्त निवडून द्या; मंत्री करण्याची जबाबदारी माझी,’ अशी घोषणा केली. त्यावेळी जिल्ह्यात रत्नाप्पाण्णा कुंभार, उदयसिंहराव गायकवाड, श्रीपतराव बोंद्रे, कल्लाप्पाण्णा आवाडे हे मातब्बर नेते होते. घाटगे तरुण आहेत व ते आता मंत्री झाले तर अनेक वर्षे जिल्ह्याचे राजकारण त्यांच्या हातात जाईल, या भीतीपोटी अन्य नेते एकत्र झाले व घाटगे यांचा निसटता पराभव झाला.
सांगरूळ विधानसभा मतदार संघात १९९५ च्या निवडणुकीत माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या पहिल्या निवडणूक प्रचाराची पहिली सभा फुलेवाडी येथील दत्त मंगल कार्यालयात झाली होती. त्यावेळी पीएन - महादेवराव महाडिक - अरुण नरके या त्रिमूर्तींच्या ताब्यात जिल्ह्याचे राजकारण होते. प्रचारसभेत अनेकांनी ‘पीएन साहेब आमदार झालेच,’ मंत्री होण्याच्याही घोषणा केल्या. त्यावेळी भुयेकर यांनी सर्वांना सावध केले होते व ‘आपण अगोदर पीएन यांना आमदार करूया, मंत्रिपदाची चर्चा केली तर विरोधक जागे होतील,’ असे ते म्हणाले होते. घडलेही तसेच व पीएन यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत सतेज पाटील हे गृहराज्यमंत्री होते. त्यावेळी प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांना कॅबिनेट मंत्री करण्याची घाई झाली होती. त्यांच्या पराभवासाठी अन्य अनेक कारणे होती, त्यांतील हेदेखील एक कारण होते.
मंत्रिपदाची अशी जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा विरोधकांपेक्षा स्वपक्षातीलच लोक जास्त जागे होतात व पराभवासाठी कामाला लागत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. पी. एन. पाटील यांना काँग्रेस पक्षांतर्गत याचा अनेकदा फटका बसला आहे; कारण त्यांचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी बंधुत्वाचे संबंध होते. त्यामुळे ते आमदार झाले तर आपल्याला ऐकणार नाहीत, म्हणून त्यांचा काटा काढण्याचे राजकारण झाले आहे.
कोल्हापूरच्या मातीला हा शापच आहे. आधी नाव झाले की तसे घडत नाही, असे अनेकदा घडले आहे. मागे एकदा काँग्रेसवाले मंत्रिपद द्या म्हणून आग्रह करू लागल्यावर पोपटराव जगदाळे यांचे नाव ‘एस. टी. महामंडळाचे संचालक’ म्हणून जाहीर झाले. वृत्तपत्रांत त्यांचे फोटो प्रसिद्ध झाले; पण पद काही मिळाले नाही. - पी. बी. पोवार, काँग्रेसचे जुने कार्यकर्ते

Web Title: Before the election, the minister is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.