राज्यातील २४९ बाजार समित्यांचे बिगुल वाजले; कोल्हापूर, जयसिंगपूर, गडहिंग्लजसाठी २८ एप्रिलला मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 01:00 PM2023-03-22T13:00:21+5:302023-03-22T13:00:52+5:30
सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
कोल्हापूर : ‘कोल्हापूर’, ‘जयसिंगपूर’ व ‘गडहिंग्लज’ बाजार समित्यांसाठी सोमवार (दि. २७) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. तिन्ही बाजार समित्यांसाठी २८ एप्रिलला मतदान होणार असून राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया २३ डिसेंबर २०२२ पासून सुरू होणार होती. मात्र, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने निवडून आलेले विकास संस्था सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांचा मतदार यादीत समाविष्ट करण्याची तरतूद नव्हती. याविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर संबंधित संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर प्रक्रिया तातडीने सुरू करून ३० एप्रिल २०२३ पर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार, सोमवारी अंतिम याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य निवडणूक प्राधीकरणाने मंगळवारी प्रत्यक्ष निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.
सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून ३ एप्रिलपर्यंत मुदत राहणार आहे. माघारीची मुदत २० एप्रिल असून २८ एप्रिलला मतदान होणार आहे. तिन्ही बाजार समित्यांची रणधुमाळी सुरू झाल्याने जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापणार आहे.
असा राहणार निवडणूक कार्यक्रम :
- उमेदवारी अर्ज दाखल करणे : २७ मार्च ते ३ एप्रिल
- अर्जांची छाननी : ५ एप्रिल
- माघारीची मुदत : ६ ते २० एप्रिल
- मतदान : २८ एप्रिल
- मतमोजणी : मतदान दिनांकापासून तीन दिवसांच्या आत
राज्यातील २४९ समित्यांचे बिगुल वाजले
कोरोनामुळे सर्वच निवडणूका लांबणीवर पडल्या. त्यानंतर विकास संस्था, ग्रामपंचायत निवडणुकांमुळे पुन्हा पुढे ढकलल्या. आता प्रक्रिया सुरू झाली असून राज्यातील २४९ बाजार समित्यांचे बिगुल वाजले आहे.
‘कोल्हापूर’चे निवडणूक अधिकारी मालगावे
काेल्हापूर बाजार समितीसाठी सहायक निबंधक प्रदीप मालगावे, ‘गडहिंग्लज’ साठी सहायक निबंधक अमित गराडे तर ‘जयसिंगपूर’ साठी प्रेमदास राठोड यांची नियुक्ती केली आहे.