चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 'या' दिवशी होणार मतदान; कोल्हापूर, मुंबई व पुण्यात मतदान केंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 05:09 PM2022-10-12T17:09:21+5:302022-10-12T17:11:46+5:30

मेघराज राजेभोसले यांनी आपल्या अधिकारात निवडणूक जाहीर केल्यानंतर दोन दिवसांनी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनीही निवडणूक जाहीर केली होती. धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने दोन्ही निवडणुका बेकायदेशीर ठरवल्या.

Election of All India Marathi Film Corporation will be held on February 5 | चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 'या' दिवशी होणार मतदान; कोल्हापूर, मुंबई व पुण्यात मतदान केंद्रे

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 'या' दिवशी होणार मतदान; कोल्हापूर, मुंबई व पुण्यात मतदान केंद्रे

googlenewsNext

कोल्हापूर : अंतर्गत राजकारणामुळे वादग्रस्त ठरलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक ५ फेब्रुवारी २०२३ ला व मतमोजणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. धर्मादाय उपायुक्त कार्यालयाचे निरीक्षक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आसिफ शेख यांनी मंगळवारी हा निवडणूक कार्यक्रम निश्चित केला आहे. ही निवडणूक जुन्या मतदार यादीनुसार होणार असून फक्त कोल्हापूर, मुंबई व पुणे या तीन ठिकाणीच मतदान केंद्रे आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया १० जानेवारीपासून सुरू होत आहे.

चित्रपट महामंडळातील अंतर्गत राजकारणामुळे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व अन्य कार्यकारिणी असे दोन गट पडले आहेत. मागील महिन्यात मेघराज राजेभोसले यांनी आपल्या अधिकारात निवडणूक जाहीर केल्यानंतर दोन दिवसांनी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनीही निवडणूक जाहीर केली. एकाच संस्थेची दोनवेळा निवडणूक हा प्रकारच धर्मादायच्या कायद्यात बसत नसल्याने धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने दोन्ही निवडणुका बेकायदेशीर ठरवल्या.

निवडणूक जाहीर करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून आसिफ शेख काम पाहत आहेत. त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस कामकाजाच्या विषयासह त्या सभेच्या ठरलेल्या दिवसापूर्वी किमान १५ दिवस आधी प्रसिद्ध झाली पाहिजे या नियमानुसार प्रसिद्ध केली. इतर कोणतीही सूचना किंवा नोटीस सभासदांना देता येणार नाही, अशी सक्त सूचना केली आहे. महामंडळाची नवी घटना अजून मंजूर नसल्याने ही निवडणूक जुन्या मतदार यादीनुसार होणार असून त्यात सभासद संख्या १८ हजार आहे.

निवडणूक कार्यक्रम असा

  • अंतिम मतदार यादी प्रसिद्धी : ९ जानेवारी २०२३
  • उमेदवारी अर्ज देणे : १० ते १६ जानेवारी
  • माघार : १८ ते २० जानेवारी
  • मतदान : ५ फेब्रुवारी
  • मतमोजणी : ८ फेब्रुवारी

Web Title: Election of All India Marathi Film Corporation will be held on February 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.