'हाऊसिंग फायनान्स'साठी मोर्चेबांधणी; महाविकास-महायुत्तीमध्ये रस्सीखेच
By विश्वास पाटील | Published: December 2, 2023 01:00 PM2023-12-02T13:00:41+5:302023-12-02T13:01:47+5:30
राज्यभरात संस्थेचे १६१५ मतदार, २४ डिसेंबरला मतदान
विश्वास पाटील
कोल्हापूर : राज्यभरातील गृहनिर्माण सोसायट्या व गृहनिर्माणसाठी अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था मतदार असलेल्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनवर ताबा मिळवण्यासाठी महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या संस्थेची निवडणूक २४ डिसेंबरला आहे. राज्यभरात संस्थेचे १६१५ मतदार आहेत.
या महामंडळाची सूत्रे आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडे आहेत. पवार यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते व्ही.बी. पाटील हे महामंडळाचे गेली पाच वर्षे अध्यक्ष व छत्रपती संभाजीनगरचे सुनील जाधव हे उपाध्यक्ष आहेत. अध्यक्ष पाटील यांनी अर्धा कप चहा न घेताही संस्थेला अडचणीतून बाहेर काढण्याचे काम केले आहे. माघारीची मुदत १३ डिसेंबरला आहे. २५ जागांसाठी ७२ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. राजेंद्र वीर निवडणूक अधिकारी आहेत.
प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालये असलेल्या या संस्थेचे राज्यभरात स्वमालकीची एक हजार कोटींची मालमत्ता आहे. राज्य शासनाने या संस्थेला यापूर्वी ६०० कोटी रुपयांचे कर्ज दिले. त्याची वसुलीच झालेली नव्हती. आता त्या कामास वेग दिला आहे. सध्या तेच काम सुरू आहे. आताच्या संचालक मंडळात शरद पवार गटाचे ११, अजित पवार यांना मानणारे २, काँग्रेसचे ४ आणि भाजपचे ३, ठाकरे गटाचा एक असे बलाबल आहे. संस्था अजूनही अडचणीत असल्याने निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे.
सत्तारुढ आघाडीकडून अध्यक्ष व्ही. बी. पाटील, उपाध्यक्ष सुनील जाधव, अंकुश काकडे, जळगावचे सतीश अण्णा पाटील, अमरावतीचे वसंतराव घुईखेडकर हे उपमुख्यमंत्री पवार, भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर, मुंबईचे सीताराम राणे, नाशिकचे बाळासाहेब सानप यांच्याशी त्यासंदर्भात चर्चा करत आहेत.
निपुन कोरे यांचाही अर्ज
या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दरेकर यांनी जास्त लक्ष घातले आहे. त्यांच्या सूचनेवरूनच वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांनीही अर्ज दाखल केल्याची चर्चा आहे.
नाशिक, पुण्याचे वर्चस्व
या संस्थेचे १६१५ मतदार आहेत. त्यातील १०९८ मतदान नाशिक, पुणे आणि मुंबई विभागाचे मिळून आहेत. मावळत्या संचालक मंडळात या तीन विभागांचे संचालक मंडळातही वर्चस्व होते. त्यांचे २१ पैकी ११ संचालक होते. छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागातील मतदान ५१७ असून या विभागाचे नऊ संचालक आहेत. आता संचालकांची संख्या २५ झाल्याने सर्वच विभागातील प्रतिनिधित्व वाढणार आहे.