निवडणुकीची तयारी पूर्ण
By admin | Published: September 13, 2014 12:44 AM2014-09-13T00:44:40+5:302014-09-13T00:47:46+5:30
जिल्हाधिकारी : जिल्हा निवडणूक यंत्रणा गतिमान
कोल्हापूर : राज्य विधानसभेची निवडणूक जाहीर होताच जिल्हा निवडणूक यंत्रणा गतिमान झाली. १५ आॅक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात आज, शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
विधानसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होणार असल्याने त्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात यावे, अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने केल्यामुळे निवडणुकीची सर्व कागदोपत्री तयारी पूर्वीच करण्यात आली होती. आज, शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दहा निवडणूक निर्णय अधिकारी उद्या, शनिवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहेत. जिल्ह्यातील दहा मतदारसंघांसाठी लागणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे यापूर्वीच कोल्हापुरात येऊन पोहोचली असली तरी आणखी जादा यंत्रे पाटणा, बिहार येथून येणार आहेत. निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यांना आवश्यक असलेल्या पंधरा हजार कर्मचाऱ्यांच्याही नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी माने यांनी सांगितले.
आचारसंहिता कक्ष, मीडिया सेल तयार केले आहेत. त्याच्या जबाबदाऱ्याही निश्चित केल्या आहेत. आचारसंहिता कक्षाचे काम अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, तर मीडिया सेलचे काम भूसंपादन अधिकारी संजय पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
लोकसभा निवडणूक झाल्यापासून आतापर्यंत ४५ हजार मतदारांची नव्याने नोंदणी झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवसापर्यंत ही नोंदणी सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मतदारयादीत गोंधळ राहणार नाही याची प्रशासनातर्फे दक्षता घेतली गेल्याचेही त्यांनी सांगितले.
मॉडेल मतदार केंद्रे तयार करण्याच्या सूचना निवडणूक आयोगामार्फत करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जास्तीत जास्त मतदान केंद्रावर चांगल्या सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाल्याने महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती यांना देण्यात आलेली वाहने जमा करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
१५ आॅक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी २० सप्टेंबर रोजी अधिसूचना काढली जाणार आहे. २० ते २७ सप्टेंबर अखेर उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. २९ सप्टेंबरला छाननी होणार आहे. १ आॅक्टोबरपर्यंत माघारीची मुदत आहे. एकंदरीत सर्व शासकीय यंत्रणा आजपासूनच गतिमान झाली. (प्रतिनिधी)