कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 03:30 PM2019-04-22T15:30:37+5:302019-04-22T15:36:51+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ४००४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. दोन्ही मतदारसंघांतील सुमारे २०,००० मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोमवारी अंतिम प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट व मतदान साहित्यासह केंद्रस्थळी रवाना झाले. मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून जिल्हा निवडणूक विभाग मतदानासाठी सज्ज आहे.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ४००४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. दोन्ही मतदारसंघांतील सुमारे २०,००० मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोमवारी अंतिम प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट व मतदान साहित्यासह केंद्रस्थळी रवाना झाले. मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून जिल्हा निवडणूक विभाग मतदानासाठी सज्ज आहे.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून दोन्ही मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रातील सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात झाली. यामध्ये कोल्हापूर दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांच्या उपस्थितीत पेटाळा येथील राम गणेश गडकरी हॉल, करवीरचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत रमनमळा, बहुउद्देशीय हॉल येथे, कोल्हापूर उत्तरचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत विवेकानंद महाविद्यालय येथे हे प्रशिक्षण झाले.
सुरुवातीला कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे कोणती केंद्रे आहेत याची माहिती देण्यात आली. त्यानंतर क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक प्रशिक्षण होऊन त्यानंतर सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून महत्वपूर्ण माहिती देण्यात आली. मतदारांची ओळख पटवून घेऊनच त्यांना मतदानाचा हक्क बजावायला द्या, मतदानासाठी मतदान चिठ्ठीही पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही त्यामुळे मतदारांकडून इतर पुराव्यांची खातरजमा करा अशा विविध सुचना त्यांनी केली.
दरम्यान कोल्हापूरच्या निवडणूक निरिक्षक अलका श्रीवास्तव व निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर दक्षिण, कागल या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली.
मतदारसंख्या
लोकसभा मतदार संघ पुरुष महिला इतर एकूण
कोल्हापूर ९५७१८३ ९१७१४३ १९ १८७४३४५
हातकणंगले ९१४३५८ ८५८१३८ ६७ १७७२५६३
मतदान केंद्रे
लोकसभा मतदार संघ ग्रामीण शहरी एकूण
कोल्हापूर १५८० ५६८ २१४८
हातकणंगले ३९८ ४५८ १८५६
मतदान कर्मचारी
लोकसभा मतदार संघ नियुक्त कर्मचारी राखीव कर्मचारी
कोल्हापूर १०,७४० १०७४
हातकणंगले १०,१४३ ९२८
मतदारांनी उत्स्फूर्तपणे व भयमुक्त वातावरणात आपल्या पवित्र मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्य करावे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी कोल्हापूर मतदारसंघातील मतदान कर्मचाऱ्यांना अंतिम प्रशिक्षण देऊन त्यांना मतदान यंत्र व साहित्यासह केंद्रांवर रवाना करण्यात आले आहे.
-दौलत देसाई,
निवडणूक निर्णय अधिकारी,
कोल्हापूर मतदारसंघ
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी सहा विधानसभा मतदारसंघातील मतदान कर्मचाऱ्यांना अंतिम प्रशिक्षण देऊन त्यांना मतदान यंत्र व मतदान साहित्यासह केंद्रांकडे रवाना करण्यात आले. निवडणूक यंत्रणा सज्ज असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी निर्भयपणे आपला हक्क बजावावा.
-नंदकुमार काटकर,
निवडणूक निर्णय अधिकारी,
हातकणंगले मतदारसंघ