जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड १२ जुलैला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:28+5:302021-06-29T04:17:28+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड १२ जुलैला तर सभापतीपदाच्या निवडी १३ जुलैला होणार आहेत. जिल्हाधिकारी ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड १२ जुलैला तर सभापतीपदाच्या निवडी १३ जुलैला होणार आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर केला असून, पीठासन अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांची नियुक्ती करण्यात आली.
निवड कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. बहुतांशी नावे निश्चित मानण्यात येत असल्याने हालचालींना मर्यादा असल्या तरी विरोधी भाजप, जनसुराज्यची यामध्ये भूमिका काय राहणार आहे, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड सोमवार दि. १२ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात होणार आहे. सकाळी ११ ते १ या वेळेत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून त्यानंतर सभा सुरू होईल. छाननी झाल्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटे देण्यात येतील. गरज पडल्यास प्रत्यक्ष मतदान घेण्यात येईल. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवार २३ जुलै रोजी चारही सभापतींच्या दुपारी २ वाजता निवडी होणार आहेत. सकाळी ११ ते १ या वेळेत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून दोन वाजता सभा सुरू होईल. छाननीनंतर माघारीसाठी १५ मिनिटे असतील. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू होईल.
सहाही पदांसाठीची नावे निश्चित मानली जातात. काही बाबी गेल्याच वर्षी ठरल्या होत्या. त्यामुळे अन्य इच्छुकांना फारसा वाव नसल्याचे सध्याचे चित्र आहे. तरीही राजकारणात काहीही घडू शकते. जिल्हा परिषदेच्याही इतिहासात अशा अनेक घटना घडल्याने जो-तो आपापल्या परीने प्रयत्न करण्याच्या तयारीत आहे.
गेल्या वर्षी २ जानेवारीला झालेल्या निवडीमध्ये ६५ पैकी ४१ मते घेत महाविकास आघाडीने भाजपला सत्तेतून पायउतार केले होते. ६७ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत भाजपचे सदस्य विजय भोजे यांना मताचा अधिकार नव्हता आणि राष्ट्रवादीचे जीवन पाटील त्यावेळी गैरहजर होते. त्यामुळे ६५ मतदान झाले. आताही तेवढेच मतदान होण्याची शक्यता आहे. कारण, भोजे यांना मताचा अधिकार नाही आणि काँग्रेसचे सदस्य प्रवीण माने यांचे निधन झाले आहे.
चौकट
तर लढत अटीतटीची होऊ शकते
शौमिका महाडिक यांना अध्यक्ष करताना काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादीचा एक सदस्य गैरहजर राहिला होता. बजरंग पाटील यांनाही अध्यक्ष करताना राष्ट्रवादीचा एक सदस्य गैरहजर होता. अशा काही क्लृप्त्या खेळल्या गेल्या, निधी आणि राजीनाम्यामुळे कुणी वेगळी भूमिका घेतली तर मात्र ही एकतर्फी होणारी निवडणूक अटीतटीची होऊ शकते. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांचा ‘गोकुळ’च्या विजयानंतर उधळलेला घोडा रोखणे सहजशक्य नाही. परंतु डावलल्याच्या भूमिकेतून कुणी ईर्षेने उतरला तर मग मात्र लढत आणखी रंगणार यात शंका नाही.
असे आहेत संभाव्य दावेदार (अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार ही शक्यता गृहीत धरून)
अध्यक्ष : राष्ट्रवादी- युवराज पाटील, जयवंत शिंपी
काँग्रेस : सरिता शशीकांत खोत
उपाध्यक्ष : राष्ट्रवादी : जयवंत शिंपी, मनोज फराकटे, विजय बोरगे
काँग्रेस : रसिका पाटील, पांडुरंग भांदिगरे
बांधकाम सभापती : वंदना अरुण जाधव-तळाशी (शिवसेना)
महिला व बालकल्याण : शिवानी भोसले- नानीबाई चिखली (शिवसेना)
समाजकल्याण : कोमल मिसाळ-वडणगे (शिवसेना)
शिक्षण : कल्लाप्पा भोगण-कोवाड (काँग्रेस)