विभागातील ९४९ संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:37 AM2020-12-13T04:37:39+5:302020-12-13T04:37:39+5:30
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील ६९२४ सहकारी संस्था डिसेंबर २०२० अखेर निवडणुकीस ...
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील ६९२४ सहकारी संस्था डिसेंबर २०२० अखेर निवडणुकीस पात्र आहेत. त्यांपैकी कर्जमाफीमुळे थांबलेल्या ९४९ सहकारी संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहेत. याबाबतची माहिती सहकार निवडणूक प्राधिकरणाने घेतली असून जानेवारीपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी केली आहे.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका जानेवारी व फेब्रुवारीमध्ये तीन महिने लांबणीवर टाकल्या होत्या. मात्र मार्चपासून कोरोनाचे संकट आल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. आतापर्यंत तीन वेळा निवडणुकांना मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ डिसेंबरअखेर आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवल्याने निवडणुका आणखी पुढे जातील, असा अंदाज होता. मात्र कोरोना रुग्णांची संख्या पाहता, हळूहळू सर्वच निवडणुका घेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत. कर्जमाफीमुळे थांबवलेल्या कोल्हापूर विभागात ९४९ संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेणार आहेत. यामध्ये सर्वाधिक ५८० संस्था या कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर पुढील संस्थांच्या निवडणुका होतील.
जूनपर्यंत निवडणुका संपविणे आव्हानात्मक
जानेवारीपासून सहा महिन्यांत म्हणजेच जून २०२१ पर्यंत सर्व पात्र संस्थांच्या निवडणुका संपविण्याचे प्राधिकरणाचे नियोजन आहे. मात्र सहकार विभागाकडील यंत्रणा व संस्था पाहता एवढ्या कालावधीत निवडणुका घेणे आव्हानात्मक आहे.
ठरावांचा मुद्दा न्यायप्रविष्ट होणार?
संस्था प्रतिनिधींचे ठराव असणाऱ्या ‘अ’ वर्गातील संस्थांची निवडणूक प्रक्रिया ठराव गोळा करून थांबली आहे. मात्र या कालावधीत संलग्न संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने त्यांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. या संस्थांच्या निवडणुका घेऊन नवीन संचालक मंडळाचा ठराव ग्राह्य मानावा. हा मुद्दा न्यायप्रविष्ट होण्याची शक्यता आहे.
विभागातील वर्गवारीनुसार निवडणुकीस पात्र संस्था
जिल्हा ‘अ’ ‘ब’ ‘क’ ‘ड’
कोल्हापूर १८ १०७३ २०१५ ९९१
सांगली १४ ५५१ ६२० ३२८
सातारा ६ ५८३ ४१७ ३०८
---------------------------------------------------
एकूण ३८ २२०७ ३०५२ १६२७