ग्रामपंचायतीनंतर सहकारी संस्थांच्या निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:25 AM2021-01-03T04:25:10+5:302021-01-03T04:25:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा प्रस्ताव मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे गेला असून, येत्या दोन दिवसात या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा प्रस्ताव मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे गेला असून, येत्या दोन दिवसात या निवडणुकांबाबत अधिकृत घोेषणा होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी १५ जानेवारीपर्यंत आहे, यामध्ये सहकार विभागाचे अधिकारी व काही कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.
गेले वर्षभर कर्जमाफी व कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. डिसेंबरपासून ‘पदवीधर’, ‘शिक्षक’सह ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची मागणी होत आहे. मात्र, ३१ डिसेंबर २०२०पर्यंत संस्थांच्या निवडणुकांना शासनाने मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपण्यापूर्वीच सहकार निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे हा प्रस्ताव आहे. निवडणूक घ्यावी की नको, यावर मंत्रिमंडळातच दोन मतप्रवाह आहेत. त्यामुळे निवडणुकीबाबत निर्णय झालेला नाही. न्यायालयाने आदेश दिलेल्या राज्यातील ३८ संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. एकूणच शासन पातळीवरील हालचाली पाहता, येत्या दोन दिवसात या निवडणुकांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेत सहकार विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने आताच संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करणे अडचणीचे आहे. त्यामुळे १५ जानेवारीनंतर ‘केडीसीसी’, ‘गोकुळ’च्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. साधारणत: मार्चच्या पहिल्या आठवड्यात या दोन्ही संस्थांसाठी मतदान होऊ शकते. त्यादृष्टीने सहकार विभागाने तयारी सुरू केली आहे.
३ फेब्रुवारीला ‘गोकुळ’ची सभा
जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा ५ फेब्रुवारीला होत आहे. बँकेने त्याची तयारी सुरू केली आहे. ‘गोकुळ’ची सभाही ३ फेब्रुवारीला होणार असून, जिल्हाधिकाऱ्यांकडे या सभेसाठी परवानगी मागण्यात आली आहे.