पाच राज्यांतील निवडणुका म्हणजे अंतिम सत्य नव्हे
By admin | Published: May 29, 2016 01:12 AM2016-05-29T01:12:29+5:302016-05-29T01:12:29+5:30
वसंत भोसले : समाजवादी प्रबोधिनी आयोजित व्याख्यान
इचलकरंजी : प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी आहे. तेथील अर्थकारण, राजकारण, व्यवसाय, व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे आता झालेल्या पाच राज्यांतील निवडणुका म्हणजे अंतिम सत्य नव्हे. दोन लोकसभेच्या निवडणूक कालावधीमध्ये विधानसभेच्या निवडणुकींच्या माध्यमातून संपूर्ण देश ढवळून निघतो. त्यामुळे राज्याच्या निवडणुकांवरून देशाचा कल ठरवणे अवघड आहे, असे मत ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी व्यक्त केले. येथील समाजवादी प्रबोधिनीमध्ये आयोजित ‘पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचा अन्वयार्थ’ या विषयावर ते बोलत होते.
भोसले म्हणाले, सन २०१४ ते २०१९ या लोकसभेच्या कालावधीमध्ये २९ राज्ये व दोन केंद्रशासित अशा ३१ विधानसभा निवडणुका होतात. त्यातील चार राज्यांच्या निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकीबरोबर होतात. उर्वरित २७ पैकी आतापर्यंत १२ विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत, तर १५ विधानसभेच्या निवडणुका अजून होणार आहेत. आता झालेल्या निवडणुकांचे निकाल हे तेथील सार्वजनिक वितरण व्यवस्था व परिस्थिती यावर मिळालेले यश आहे.
सध्या केंद्रात सत्तेवर असलेले सरकार आणि मागील सरकार यांच्या धोरणात्मक निर्णयात अद्याप तरी काहीच फरक दिसत नाही. व्यक्तीच्या वातावरणाचा फरक पाहावयाचा झाल्यास, एकवेळ प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेल्या चंद्राबाबूंनाही पराभव स्वीकारावा लागला. हा इतिहास पाहता देशात व्यक्तिकेंद्रित प्रभाव टिकून राहत नसल्याचे दिसून येते. मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त होत असलेल्या उपक्रमांमधूनही भारत आता काँग्रेसमुक्त होतो आहे असे दाखविले जात आहे, ते वास्तव नाही. कारण काही राज्यांच्या निवडणुकांवरून तसा अर्थ काढला जाऊ शकत नाही. अमर पटेल यांनी आभार मानले.