संस्थांच्या निवडणुका तालुकास्तरावर व्हाव्यात

By admin | Published: December 30, 2014 09:16 PM2014-12-30T21:16:37+5:302014-12-30T23:41:38+5:30

दूध, सेवा संस्थांची मागणी : खर्चिक आणि वेळकाढू असणारी प्रक्रिया बदलण्याची गरज

Elections of the institutions should be done at taluka level | संस्थांच्या निवडणुका तालुकास्तरावर व्हाव्यात

संस्थांच्या निवडणुका तालुकास्तरावर व्हाव्यात

Next

संजय पारकर- राधानगरी -जिल्हास्तरावरून होणाऱ्या प्राथमिक दूध व विकास सेवा संस्थांच्या निवडणूक अधिकाऱ्यांचे मुख्यालय कोल्हापूरऐवजी तालुक्यातील सहायक निबंधक कार्यालयात ठेवावे, अशी मागणी या संस्थांमधून होत आहे. असे झाल्यास वेळ व पैशाची बचत होऊन मनस्तापही कमी होणार आहे.
दोन वर्षांपासून रेंगाळलेली सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सहकार निवडणूक प्राधिकरणामार्फत सुरू आहे. ‘ड’ व ’क’ वर्गातील संस्थांच्या निवडणुका तालुका निबंधकांच्या अखत्यारित सुरू आहेत. मात्र, सर्वच दूध संस्थांसाठी जिल्हास्तरावर सहायक निबंधक कार्यालय असल्याने या निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. जिल्ह्यातील सुमारे १२५ दूध संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी नेमलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांचे मुख्यालय कोल्हापुरातील या कार्यालयात राहणार आहे.
त्याचबरोबर दहा लाखांवर भांडवल असणाऱ्या प्राथमिक विकास संस्था ‘ब’ वर्गात मोडतात. त्यांची निवडणूक प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर यांच्या स्तरावरून सुरू आहे. या संस्थांच्या निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती व त्यांचे नियंत्रण याच स्तरावरून होणार असल्याने या निवडणूक अधिकाऱ्यांचे मुख्यालय तेथेच राहणार आहे.
या दूध व सेवासंस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या सभासदांना निवडणूक कार्यक्रमादरम्यान वारंवार कोल्हापुरात जावे लागणार आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यांचे कोल्हापूरपासूनचे अंतर, विस्तार याचा विचार करता ही प्रक्रिया मोठी खर्चिक व वेळकाढू ठरणार आहे. शिवाय यासाठी होणारा मनस्ताप लक्षात घेता सर्वसामान्य सभासद निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहणार आहेत. ज्या उद्देशाने सहकार निवडणूक प्राधिकरणाची स्थापना करून त्यांच्यामार्फत निवडणुका घेण्यात येत आहेत, तो उद्देशच यामुळे असफल होणार आहे.


जास्तीत जास्त सभासदांनी या प्रक्रियेत सहभाग घ्यायचा असेल, तर ही प्रक्रिया तालुकास्तरावर होणे आवश्यक आहे. तरच वेळ व पैसाही वाचणार आहे. याबाबत आवश्यक ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी सहकारी संस्थांतून होत आहे.

Web Title: Elections of the institutions should be done at taluka level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.