जुलैमध्ये निवडणुकीचा धडाका
By admin | Published: June 8, 2015 12:17 AM2015-06-08T00:17:28+5:302015-06-08T00:48:01+5:30
हातकणंगले तालुका : २१ ग्रामपंचायतींच्या राजकीय घडामोडींना वेग
दत्ता बिडकर- हातकणंगले -हातकणंगले तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जुलै महिन्यात होण्याची शक्यता प्रशासकीय यंत्रणेने व्यक्त केली आहे. प्रभाग रचना आणि सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे
तालुक्यातील चंदूर, कबनूर, माणगाव, तिळवणी, जंगमवाडी, माणगाववाडी, रुई, किणी, मनपाडळे, पाडळी, वाठार तर्फ वडगाव, खोची, लाटवडे, तासगाव, वाठार तर्फ उदगाव, मिणचे, हालोंडी, कुंभोज, नेज, दुर्गेवाडी, बिरदेववाडी या ग्रामपंचायतींच्या मुदती जुलै ते सप्टेंबर या कालावधीत संपत आहेत. दरम्यान, पावसाळा सुरू होत असल्याने प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. यापूर्वी पुरेसा कर्मचारी वर्ग आणि पोलीस बंदोबस्ताचे कारण निवडणूक आयोगाने देत यापूर्वी जाहीर झालेला कार्यक्रम रद्द केला होता.
तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या ९४ प्रभागांमधून २६१ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत. याकरिता एक लाख १६ हजार ७५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक आयोगाने प्रभाग आरक्षण आणि सरपंच आरक्षण जाहीर केल्यामुळे गावा-गावांमध्ये निवडणूक चर्चेला उधाण आले आहे. ग्रामपंचायत निवडणुका जवळ आल्याने प्रत्येक
गट-तट रणनिती आखण्यात व्यस्त आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या भूमिका घेणारे नेते ग्रामपंचायतीसाठी स्थानिक आघाड्यांचे राजकारण करून सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. याची समीकरणेही बदलली आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे उट्टे काढणारे ग्रामपंचायतीसाठी एकत्र येताना यापूर्वीचे राजकारण विसरून आपल्या गटाची सत्ता कशी येईल, याकरिता कट्टर विरोधकांशी हातमिळवणी करीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय, आदींसह इतर गावपातळीवरील आघाड्या आपलीच सत्ता यावी यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे राजकीय चर्चा आणि ग्रामीण भागातील हालचाली गतिमान झाल्या आहेत.
राज्यातील सत्तातरानंतर निवडणुका
राज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार जाऊन भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत आले आहे. या घडामोडीनंतर तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीच्या
पहिल्याच निवडणुका होत आहेत.
यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त
झाले आहे.