नगरपालिकांच्या विषय समित्यांची १९ ला निवडणूक
By Admin | Published: December 15, 2015 12:19 AM2015-12-15T00:19:34+5:302015-12-15T00:33:50+5:30
विधान परिषद निवडणुकीमुळे सहलीवर गेलेल्या नगरसेवकांची गोची
इचलकरंजी : जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांकडील विविध विषय समित्यांची व सभापतिपदाची निवडणूक १९ डिसेंबरला होणार आहे. सध्या होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समित्यांच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.जिल्ह्यातील एकूण नऊ नगरपालिकांपैकी इचलकरंजीची सर्वांत मोठी नगरपालिका आहे. येथे कॉँग्रेस व राष्ट्रवादी अशी आघाडी सत्तेवर असली तरी कॉँग्रेसच्या नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे राजीनामा देण्यास नकार देऊन जानेवारी महिन्यात बंड केले आहे. त्यांच्या या बंडाला विरोधी शहर विकास आघाडी व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिल्याने इचलकरंजी नगरपालिकेतील राजकीय संदर्भ बदलले आहेत.विधान परिषद निवडणुकीमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व आमदार महादेवराव महाडिक यांच्यात सरळ लढत असल्याने या निवडणुकीत रंगत चढली आहे. अशा पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांकडील विषय समित्यांची निवडणूक १९ डिसेंबरला घेण्याची विषयपत्रिका सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी जारी केली.विधान परिषद निवडणुकीचे मतदान २७ डिसेंबरला होणार आहे. तत्पूर्वी पालिकांच्या विषय समित्यांची निवडणूक होणार असल्यामुळे सहलीवर गेलेल्या नगरसेवकांना १९ डिसेंबरच्या समिती निवडणुकीच्या सभेला उपस्थित राहावे लागणार आहे. त्यामुळे नगरसेवकांना सहलीवर पाठविण्याची अडचण नेत्यांसमोर निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
इचलकरंजीत सात ‘चळवळ्यांना’ दूर ठेवणार
इचलकरंजी नगरपालिकेत कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे ११ व शहर विकास आघाडीचे १७ असे पक्षनिहाय बलाबल आहे.
बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य व स्वच्छता, शिक्षण आणि महिला व बालकल्याण अशा पाच समित्या १९ डिसेंबरला निवडल्या जातील.
या समित्यांवर कोठा पद्धतीने एकूण १९ पैकी कॉँग्रेसचे दहा, राष्ट्रवादीचे तीन व ‘शविआ’चे सहा असे नगरसेवक त्या-त्या पक्षाच्या पक्षप्रतोदांकडून निवडण्यात येतील आणि एका नगरसेवकाला कमाल तीन समित्यांमध्ये सहभागी होता येते.
कॉँग्रेसमधील सहा नगरसेवकांना व राष्ट्रवादीतील एका नगरसेवकाला ते ‘चळवळी’ असल्याने समित्यांपासून दूर ठेवले जाईल, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात आहे.
चळवळी नगरसेवकांत नगराध्यक्षा बिरंजे, संजय तेलनाडे, चंद्रकांत शेळके, रेखा रजपुते, मीना बेडगे, सुनीता मोरबाळे आणि विठ्ठल चोपडे यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. अन्यथा त्यांना शिक्षण आणि महिला व बालकल्याण समितीत घातले जाईल.