‘गडहिंग्लज’ कारखान्यासह २८०० संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; पावसाचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 12:39 PM2022-07-16T12:39:51+5:302022-07-16T12:40:16+5:30

सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर २०२२ अखेर लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला

Elections of co operative societies postponed due to rain | ‘गडहिंग्लज’ कारखान्यासह २८०० संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; पावसाचे कारण

‘गडहिंग्लज’ कारखान्यासह २८०० संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; पावसाचे कारण

Next

कोल्हापूर : राज्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरू असल्याने अशा परिस्थितीत सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे उचित होणार नाही. त्यामुळे सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर २०२२ अखेर लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश शुक्रवारी काढण्यात आला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज साखर कारखाना, कोल्हापूर अर्बन बँकेसह २८०० संस्थांच्या निवडणुका अडीच महिने पुढे गेल्या आहेत.

राज्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. १ जून ते १२ जुलैअखेर राज्यात ८९ व्यक्ती व १८१ जनावरे पावसामुळे मृत्युमुखी पडली आहेत. पावसामुळे २४९ गावे बाधित झाल्याने अशा स्थितीत निवडणुका घेणे उचित होणार नाही. त्यामुळे उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या संस्था वगळून इतर सर्व संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर आहेत, तिथे थांबवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज साखर कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता, तर कोल्हापूर अर्बन बँकेसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. त्याशिवाय जवळपास २८०० सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबली आहे.

सततच्या मुदतवाढीने संचालक जोमात

कोरोनामुळे दीड वर्ष निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर सुरू झाल्या. मात्र, विकास संस्थांच्या निवडणुका प्राधान्याने घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्याने इतर संस्थांच्या निवडणुकांचा वेग कमी झाला. त्यामुळे साखर कारखाने, बँकांच्या संचालकांना मुदतवाढीचा फायदा झाला असून, ते जोमात आहेत. मात्र, सभासदांमध्ये अस्वस्थता दिसत आहे.

या प्रमुख संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक-
गडहिंग्लज साखर कारखाना
कोल्हापूर अर्बन बँक
अण्णासाहेब चौगुले बँक
नांदणी बँक
यूथ बँक
कोहिनूर बँक, इचलकरंजी
ग्रामसेवक पतसंस्था
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी
दृष्टिक्षेपात राज्यातील निवडणुकीस पात्र संस्था-
निवडणुकीस पात्र - ३२ हजार ४७३
प्रक्रिया सुरू - ७ हजार ६२०
प्रत्येक्ष नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात - ५ हजार ६३६
नामनिर्देशन पत्र सुरू न झालेल्या - १९८४

Read in English

Web Title: Elections of co operative societies postponed due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.