Kolhapur- ‘बिद्री’, ‘भोगावतीसह दोन हजार संस्थांचे मंगळवारपासून रणधुमाळी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 12:26 PM2023-09-27T12:26:23+5:302023-09-27T12:28:20+5:30

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक स्थगितीची मुदत शनिवारी संपणार 

Elections of cooperative societies in the state are likely to start | Kolhapur- ‘बिद्री’, ‘भोगावतीसह दोन हजार संस्थांचे मंगळवारपासून रणधुमाळी?

Kolhapur- ‘बिद्री’, ‘भोगावतीसह दोन हजार संस्थांचे मंगळवारपासून रणधुमाळी?

googlenewsNext

कोल्हापूर : राज्य शासनाने पावसाळ्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली होती. मंगळवार (दि. ३) पासून संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता असून त्याची तयारी सहकार विभागाने सुरू केली आहे. ‘बिद्री’, ‘भोगावती’सह दोन हजार संस्थांची रणधुमाळी सुरू होणार आहे. सर्वाधिक संस्था दुग्ध विभागातील १९१० आहेत.

काेरोनामुळे दीड वर्षे सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. त्यानंतर निवडणुका सुरू झाल्या. जूनपर्यंत काही संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पार पडल्या. मात्र, पावसाळ्याचे कारण पुढे करत राज्य शासनाने सप्टेंबरअखेर निवडणुकांना स्थगिती दिली होती. निवडणुकांना जिथे स्थगिती दिली होती, तेथून आता प्रक्रिया सुरू होणार आहे.

परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया उमेदवारी अर्जापर्यंत पूर्ण झाली आहे. छाननी बाकी असतानाच स्थगिती आल्याने आता छाननीपासून प्रक्रिया सुरू होणार आहे.

‘बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा कारखान्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली होती. आता थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. आजरा कारखान्याचीही अंतिम यादी प्रसिध्द झाली असून ‘उदयसिंगराव गायकवाड’ व ‘इंदिरा महिला तांबाळे’ यांचीही प्रारूप यादीची प्रक्रिया सुुरू होणार आहे. ‘वारणा’, ‘महालक्ष्मी’ बँकांचा कार्यक्रम सुरू होत आहे.

‘भोगावती’, ‘बिद्री’चा प्रचार सुरू

ऑक्टोबरमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू होणार हे माहीती असल्याने ‘भोगावती’च्या सत्तारूढ गटाने संपर्क मेळावे सुरू केले आहेत. तर ‘बिद्री’च्या विरोधकांनी सत्तारुढ गटाच्या कारभारावरच आसूड ओढले असून त्याच ताकदीने सत्तारुढ गटाने उत्तर दिले आहे.

दुग्ध विभागाची दमछाक होणार

दुग्ध विभागात सहाव्या टप्प्यातील १९१० त्यापाठोपाठ सुमारे ४५० संस्थांच्या निवडणुका होत आहेत. तेथील मनुष्यबळ पाहता अधिकाऱ्यांची दमछाक होणार आहे. आठवड्याला १०० ते १२५ प्रारूप याद्यांचे कार्यक्रम लावण्याची तयारी दुग्ध विभागाने केली आहे.

अशा होणार विभागनिहाय निवडणूका :

दुग्ध संस्था - १९१०
बँका, पतसंस्था - ६२
साखर कारखाने -  बिद्री, भोगावती, आजरा, उदयसिंगराव गायकवाड, इंदिरा महिला कारखाना

Web Title: Elections of cooperative societies in the state are likely to start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.