पांडुरंगाच्या वारीत आली निवडणूक
By admin | Published: June 25, 2015 01:07 AM2015-06-25T01:07:59+5:302015-06-25T01:07:59+5:30
ग्रामपंचायत निवडणूक : मतदानादिवशीच वाखरीचे रिंगण
राजाराम लोंढे / कोल्हापूर
राज्यातील पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतीसाठी २५ जुलैला मतदान होत आहे; पण २७ जुलैला आषाढी एकादशी असल्याने पायी दिंडीसाठी रवाना झालेले लाखो भाविक मतदानापासून वंचित राहणार आहेत. तीन आठवड्यांच्या वारीत वाखरीचे गोल रिंगण महत्त्वाचे आहे. हे रिंंगण मतदानादिवशी म्हणजे २५ जुलैलाच होत असल्याने उमेदवारांनी कितीही ठरविले तरी वारकऱ्यांना मतदानासाठी गावाकडे आणणे त्यांना अशक्य आहे. शेकडो मतदार पंढरपूरच्या वाटेवर राहणार असल्याने गावकारभाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. राज्य निवडणूक आयोगाने भागवत धर्माच्या या मोठ्या सोहळ््याची दखल न घेताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
आषाढीअगोदर एकवीस दिवस कोल्हापूर जिल्ह्यातून पायी दिंड्या पंढरपूरला रवाना होतात. कागल, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, करवीर या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय आहे. २७ जुलैला आषाढी एकादशी असल्याने यंदा ५ जुलैच्या दरम्यान पायी दिंड्या रवाना होणार आहेत. प्रत्येक गावातून तीन-चार दिंड्या पंढरपूरला जातात; त्यामुळे जिल्ह्यातून साधारणत: ६० ते ७० हजार भाविक पायी दिंडीतून जातात; पण याच दरम्यान ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ४ ते १० जुलै या कालावधीत उमेदवारी अर्ज भरले जाणार असून, २५ जुलैला मतदान होणार आहे. त्यामुळे पायी वारीसाठी जाणाऱ्या मतदारांना मतदान करणे अडचणीचे होणार आहे. २५ जुलैला दिंडी पंढरपूरनजीक पोहोचलेली असते. वारकारी वारी अर्धवट सोडून मतदानासाठी येण्याची शक्यता फारच कमी आहे. उमेदवारांनी जरी वारीसाठी गेलेल्या मतदारांना आणण्याची व्यवस्था केली, तरी तीन आठवडे भक्तिभावाने सुरू केलेली वारी अर्धवट सोडण्याची अशा मतदारांची मानसिकता नसते.