इलेक्ट्रोरल बाँड म्हणजे कायदेशीर खंडणी, निरंजन टकले यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 12:14 PM2024-03-18T12:14:17+5:302024-03-18T12:15:30+5:30
प्रश्न विचारणे हीच लोकशाही : कामत
कोल्हापूर : ज्या इलेक्ट्रोरल बाँडला सरकारने कायदेशीर स्वरूप दिले, ते प्रत्यक्षात खंडणीचा भाग आहेत आणि त्यासाठी एखाद्या गँगस्टरप्रमाणे गँग तयार केली आहे, ज्यात ईडी आणि सीबीआयला सदस्य केलेले आहे, असा आरोप निरंजन टकले (मुंबई) यांनी रविवारी केले.
येथील शाहू स्मारक भवनातील मिनी हॉल येथे रविवारी झालेल्या विचारवेध संमेलनात ते बोलत होते. टकले म्हणाले, ‘गुजरातमध्ये नरेंद्र मोदी प्रथम जिंकले तेव्हा सर्वांनी त्यांचे कौतुक केले; पण सीताराम येचुरी यांनी गुजरात मॉडेल सर्वप्रथम एक्स्पोज केले. निवडणुकांमध्ये ज्यांना कधीही हरवता येत नाही, अशा शाश्वत मूल्यांना मोदींच्या काळात बदनाम करण्यास सुरुवात झाली. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ हा त्याचाच भाग होता. हा दहशतवाद आज देशात आला त्यामागे अण्णा हजारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तो आला आहे,’ असा आरोपही टकले यांनी यावेळी केला.
ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक दिलीप कामत (बेळगाव) म्हणाले, ‘लोकशाहीचे शासन संस्था आणि माध्यमे यांचे मिळून चार खांब आहेत. शाळा हा मधला कंपू आहे. प्रश्न विचारणे हीच लोकशाही आहे; पण आज तोंडावर बोट ठेवून शांत बसायला सांगतात, म्हणून बोलणे जरुरी आहे. जात आणि धर्म यांचा समावेश भांडवलशाही व्यवस्थेत आहे. ही व्यवस्था बदलायची आहे. लोकशाही समजून घेण्याची ताकद लोकांमध्ये आहे.’