इचलकरंजीत इलेक्ट्रिक गाड्यांच्या गोडावूनला शॉर्टसर्किटने आग, लाखोचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 06:03 PM2023-06-02T18:03:35+5:302023-06-02T18:27:12+5:30
सर्व गाड्या आणि स्पेअरपार्ट जळून खाक झाल्या असून केवळ सांगाडे शिल्लक
इचलकरंजी : येथील विक्रमनगरमधील इलेक्ट्रिक गाड्यांच्या गोडावूनला आज, शुक्रवारी पहाटे शॉर्टसर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये इलेक्ट्रिक गाड्या, गाड्यांचे स्पेअरपार्ट, वायरिंग यांचा समावेश आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
विक्रमनगर परिसरात इलेक्ट्रिक गाड्यांचे गोडावून आहे. या गोडावूनच्या एका मोठ्या हॉलमध्ये इलेक्ट्रिक गाड्या, तर दुसऱ्या हॉलमध्ये गाड्यांचे स्पेअर पार्ट ठेवले होते. पहाटेच्या सुमारास या गोडावूनमधून धुराचे लोट बाहेर येताना नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी गोडावूनचे मालक आणि अग्निशमन दलाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तातडीने अग्निशमन दलाच्या बंबांनी धाव घेऊन पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली.
मात्र, या घटनेत गोडावूनमधील सर्व गाड्या आणि स्पेअरपार्ट जळून खाक झाल्या असून केवळ सांगाडे शिल्लक राहिलेत. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टससर्किटने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात असून याप्रकरणी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.