कोल्हापूरच्या रस्त्यावर तब्बल ७० वर्षांपूर्वीच धावली होती इलेक्ट्रिक जीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 04:27 PM2021-11-26T16:27:57+5:302021-11-26T16:29:15+5:30
कल्पकता आणि नावीन्याचा सातत्याने ध्यास बाळगणाऱ्या कोल्हापुरात ७० वर्षापूर्वीच बॅटरीवरील जीप धावली होती. उद्योगमहर्षी वाय. पी. पोवार यांनी बनविलेल्या या जीपमधून उद्योगपती शंकरराव किर्लोस्कर यांनी फेरफटका मारला होता.
कोल्हापूर : इंधन दरवाढीने हैराण झालेले वाहनधारक आता ई-बाईक्स, कारचा पर्याय निवडत आहेत. या क्षेत्रात जगभरात विविध कंपन्यांकडून संशोधन सुरु आहे. मात्र कल्पकता आणि नावीन्याचा सातत्याने ध्यास बाळगणाऱ्या कोल्हापुरात ७० वर्षापूर्वीच बॅटरीवरील जीप धावली होती. उद्योगमहर्षी वाय. पी. पोवार यांनी बनविलेल्या या जीपमधून उद्योगपती शंकरराव किर्लोस्कर यांनी फेरफटका मारला होता.
कोल्हापुरातील उद्योजकांनी येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या आणि त्याच्या समोरील मैदानावर दि. ३० एप्रिल ते १५ मे १९५० दरम्यान ‘दख्खनची दौलत’ नावाने औद्योगिक प्रदर्शन आयोजित केले होते. त्याच्या उद्घाटनासाठी राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व असणारे उद्योगपती शंकरराव किर्लोस्कर हे प्रमुख उपस्थित राहणार होते. या प्रदर्शनाच्या निमित्ताने ते पहिल्यांदाच कोल्हापुरात येणार होते. त्यातच प्रदर्शन भरविण्यात आलेला परिसरही मोठा होता. त्यामुळे किर्लोस्कर यांना त्याठिकाणी चालत फिरविणे योग्य ठरणार नाही. त्यांच्यासाठी बॅटरीवरील जीप तयार करण्याची कल्पना उद्योगमहर्षी पोवार यांच्या मनात आली. या प्रदर्शनाला एक महिना बाकी असताना आला. मग, त्यांनी या कल्पनेला कृतीची जोड देत स्व:खर्चातून सहा व्होल्ट बॅटरीवर चालणारी जीप तयार केली. प्रदर्शनानिमित्त कोल्हापुरात आलेल्या किर्लोस्कर यांनी पोवार यांच्यासमवेत या जीपमधून फेरफटका मारला. या जीपच्या निर्मितीतून कोल्हापुरातील नावीन्यपूर्ण उद्योजकीय कौशल्य सर्वांसमोर आले होते.
पेट्रोलवरील दुचाकीदेखील निर्मिती
पॅको इंडस्ट्रीजच्या माध्यमातून माझे पणजोबा उद्योगमहर्षी वाय. पी. पोवार हे पिठाची गिरण, भात कांडायचे मशिन, ऑईल इंजिनची निर्मिती करत होते. सन १९५० मधील औद्योगिक प्रदर्शनावेळी केवळ उद्योगपती शंकरराव किर्लोस्कर यांच्यासाठी बॅटरीवरील जीप त्यांनी तयार केली होती. प्रदर्शनानंतर पुढे पेट्रोलवरील लॅम्रेडा ही दुचाकीदेखील त्यांनी तयार केली. मात्र, त्याला आवश्यक परवानगी मिळाली नाही. त्यामुळे या दुचाकी उत्पादनाचा प्रकल्प पुढे सरकला नाही. पण, देशातील पहिली बॅटरीवरील चारचाकीची माझ्या पणजोबांनी शिवाजी उद्यमनगरमध्ये तयार केल्याचा आम्हाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया उद्योगमहर्षी पोवार यांचे पणतू कुशल पोवार यांनी गुरुवारी व्यक्त केली.
आठवणींना उजाळा
कोल्हापुरातील यशोधन जोशी यांना सन १९५० मधील औद्योगिक प्रदर्शनाबाबतचे माहितीपत्रक घरात सापडले. त्यात उद्योगमहर्षी पोवार यांनी बॅटरीवर चालणारी जीप तयार केल्याचे उद्योगपती किर्लोस्कर यांच्यासमवेतचे छायाचित्र होते. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.