वीज बिल थकबाकी हप्ते योजना व इलेक्ट्रिसिटी ड्युटी परतावा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:18 AM2021-06-24T04:18:04+5:302021-06-24T04:18:04+5:30
प्रताप होगाडे यांची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी वीज बिल थकबाकी हप्ते योजना राबविण्यात आली. ...
प्रताप होगाडे यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी वीज बिल थकबाकी हप्ते योजना राबविण्यात आली. तसेच उच्चदाब औद्योगिक ग्राहकांच्या इलेक्ट्रिसिटी ड्युटी फरक व परतावा देण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिले असल्याची माहिती वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी दिली.
कोरोनामुळे महावितरण कंपनीने १३ नोव्हेंबर २०२० ला ही योजना जाहीर केली. मात्र, याची मुदत ३१ मार्च २०२१ ला संपली.
दुस-या लाटेमुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे या योजनेची मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढविण्यात यावी. तसेच किमान रक्कम ३० टक्क्यांऐवजी १० टक्के करावी. मागील योजनेत सहभागी झालेल्या परंतु हप्ते न भरलेल्या सर्व ग्राहकांना नवीन योजनेत सहभागी करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
१ एप्रिल २०२० पासून उच्च औद्योगिक वीज ग्राहकांवर केव्हीएएच बिलिंग सुरू झाले असून, त्यानुसार रकमेवर इलेक्ट्रिसिटी ड्युटी आकारली जात आहे. परंतु केडब्ल्यूएच युनिटवर इलेक्ट्रिसिटी ड्युटी आकारणे आवश्यक आहे. त्यामुळे जादा रक्कम वसूल केली असून, ही रक्कम कमी करण्यात यावी व संबंधित ग्राहकांना परतावा देण्यात यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे राज्य समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली. या दोन्ही निवेदनांबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा होगाडे यांनी व्यक्त केली. शिष्टमंडळात मुकुंद माळी, भगवान साळी, महावितरणचे अधिकारी यांचा समावेश होता.