शेतकऱ्यांना वीज बिलाचा भुर्दंड
By admin | Published: June 27, 2017 01:04 AM2017-06-27T01:04:28+5:302017-06-27T01:04:28+5:30
वीज वितरण कंपनीची दंडुकशाही : शेती पंपाची सरासरी बिले आकारून वेठीस धरण्याचा प्रकार
दत्ता बिडकर । लोकमत न्यूज नेटवर्क
हातकणंगले : तालुक्यामध्ये वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना चुकीच्या वीज बिलासाठी वेठीस धरले जात आहे. ३ एचपीसाठी ९२७ वापर युनिट, तर ५ एचपीसाठी १५४५ वापर युनिट अशी शेतीपंपाची फिक्स सरासरी वीज बिले लागू करून शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. उन्हाळ्याच्या तीन महिन्यांमध्ये विहिरी कोरड्या असतानाही वीज बिले लागू केल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संताप व्यक्त होत आहे.
वीज वितरण कंपनीच्या कुंभोज, रुकडी, हेरले, चोकाक उपविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वीस ते पंचवीस गावांमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना वीज मंडळाकडून मार्च ते मे या तीन महिन्यांची वीज बिले लागू केली असून, सर्व शेतकऱ्यांना तीन एचपीच्या शेती पंपासाठी ९२७ वापर वीज युनिटचे ८५० पासून ११५० पर्यंत वीज बिल आकारणी केली आहे. सरसकट शेतकऱ्यांना १५० पासून ३०० रुपयांपर्यंत भुर्दंड लावला आहे, तर ५ एचपीच्या वीज पंपासाठी १५४५ वापर युनिट वीज बिल आकारणी केली असून, सर्व शेतकऱ्यांना समान बिल आकारणी करण्याऐवजी या बिलामध्ये सरासरी २०० पासून ५०० पर्यंत बिल आकारणी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीकडून कोणतेही प्रत्यक्ष मीटर न घेता गंडा घालण्याचे काम सुरू आहे.
शेतकऱ्यांनी गेली सहा-सहा महिने आपली वीज मीटर बंद असल्याचे वीज वितरण कंपनीला लेखी कळविले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मीटरचे रीडिंग डिस्पले बंद असल्याचे कळविले आहे. अशा शेतकऱ्यांना वीज कंपनीकडून चुकीची वीज बिले लागू केली आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहकांनी वीज कनेक्शन घेतेवेळी वीज मंडळाकडे सिक्युरिटी डिपॉझिट भरणा केलेली असते. या डिपॉझिटचे व्याज वर्षातून एकवेळ मार्चनंतरच्या वीज बिलामध्ये दिले जाते. मात्र, जिल्ह्यामध्ये फक्त हातकणंगले विभागाकडून गेल्या दोन वर्षांपासून व्याज दिले गेले नाही. मात्र, वीज मंडळ शेतकऱ्यांचे वीज बिल थकले की वीज तोडते.
वहन, स्थिर आकार बेकायदेशीर
वीज कंपनीकडून या बिलामध्ये नव्याने प्रतियुनिट १ रुपये २१ पैसे वहन आकार आणि महिन्याला २२ रुपये स्थिर आकार बेकायदेशीर लावण्यात आले आहेत. याबद्दलही शेतकऱ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.