चांदोली धरण परिसराची वीज तोडली

By admin | Published: June 24, 2015 12:13 AM2015-06-24T00:13:30+5:302015-06-24T00:44:02+5:30

थकबाकीमुळे महावितरणची कारवाई : आठ दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य

The electricity of Chandoli dam area broke | चांदोली धरण परिसराची वीज तोडली

चांदोली धरण परिसराची वीज तोडली

Next

वारणावती : चांदोली धरणाच्या १ लाख ९८ हजार रुपयांच्या वीजबिलाच्या थकबाकीपैकी एक लाख रुपये पाटबंधारे खात्याने भरले आहेत. मात्र ९८ हजारांच्या थकित रकमेमुळे वीज कंपनीने वीजपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे अंधाराचा सामना करावा लागत आहे. चार दिवस या परिसरात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पहाऱ्यासाठी असणाऱ्या पोलीस व पाटबंधारे कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून, मुसळधार पावसात व अंधारात चांदोली धरणाची सुरक्षा करावी लागत आहे. चांदोली धरण परिसर अतिसंवेदनशील असल्याने वीज पुरवठा सुरळीत राहावा, अशी मागणी होत आहे.
येथील पोलीस चौकीमध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस सेवा बजावत आहेत, पण सध्या या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. धो-धो पाऊस आणि काळाकुट्ट अंधार अशातच ड्युटीवर असणाऱ्या पोलीस व पाटबंधारेच्या कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून धरणाची सुरक्षा करावी लागत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी बिबट्यासदृश प्राण्याने पोलीस चौकीजवळ दोन कुत्र्यांवर हल्ला केला असल्याच्या चर्चेने येथे अधिकच घबराट पसरली आहे. तातडीने अतिसंवेदनशील असणाऱ्या चांदोली धरणाचा वीजपुरवठा सुरू व्हावा, अशी तेथील कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
याबाबत वारणावती येथील पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता ए. पी. निकम म्हणाले की, १ लाख ९८ हजार थकबाकीपोटी एक लाख रुपये भरले आहेत. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर उर्वरित थकबाकी भरू, अशी विनंती महावितरणकडे केली आहे. संवेदनशील परिसर असल्याने याठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत व्हावा, अशी अपेक्षा आहे.
महावितरणचे आरळा येथील शाखा अभियंता देशमाने म्हणाले की, आठ-दहा दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित आहे. वरिष्ठ कार्यालयाने आदेश दिल्यानंतर चांदोली धरणाचा वीजपुरवठा सुरू करू. (वार्ताहर)


भीतीची छाया...
चांदोली धरण परिसरातील मुसळधार पाऊस, चांदोली अभयारण्यातील हिंस्त्र प्राण्यांचे होणारे हल्ले यामुळे या परिसरातील लोकांना भीतीच्या छायेत राहावे लागत आहे. अशातच धरणाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

Web Title: The electricity of Chandoli dam area broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.