वीज अंगावर कोसळून युवतीचा मृत्यू
By Admin | Published: May 28, 2014 12:55 AM2014-05-28T00:55:06+5:302014-05-28T00:55:17+5:30
कुटुंबाचा आधार हरपला : करंजिवणे येथे शेतात भात टोकणताना दुर्घटना
मुरगूड : कागल तालुक्यातील करंजिवणे गावातील महाविद्यालयीन युवती वर्षा आनंदा पोवार (वय १९) हिचा शेतामध्ये भात टोकणताना वीज अंगावर कोसळून जागीच मृत्यू झाला. एक वर्षापूर्वी पितृछत्र हरवलेल्या आई व लहान भावाला आधार देण्यासाठी कोल्हापूर येथील एमआयडीसीमध्ये नोकरी करणार्या वर्षाला आज सुटीच्या दिवशीच नियतीने हेरले. तिच्या आकस्मिक मृत्यूने पोवार कुटुंबाचा आधारच हरपला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, गरिबीच्या परिस्थितीतही मुरगूड विद्यालयामध्ये आठवी ते बारावीपर्यंत जिद्दीने ती शिकली. त्यानंतर तेथीलच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तिने २०१२-१३ मध्ये शिवणकामाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. दीड वर्षापूर्वी तिच्या वडिलांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने घरची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन वर्षाने एमआयडीसीमध्ये गारमेंट कंपनीत नोकरी सुरू केली होती. यातून घर व्यवस्थित चालत होते. ती कधीच शेतात जात नव्हती; पण आज, मंगळवारी सुटी असल्याने आई श्रीमती सुमन, गावातील अनंत कांबळे यांच्यासह गावातील पाझर तलावाजवळ असणार्या भटकी नावाच्या शेतात भात टोकणीसाठी गेली होती. वर्षा दुपारी घरी येऊन आई व इतरांसाठी चहा घेऊन परत शेतावर गेली. चहा पिण्यासाठी सर्वजण शेतातील झाडाखाली थांबले. इतक्यात वळीव पावसाला सुरुवात झाली. अर्धा तास पाऊस सुरू होता. चहा घेतल्यानंतर पाऊस कमी झाला म्हणून आई आणि अनंत कांबळे भात टोकणी करण्यासाठी झाडापासून दूर गेले. अचानक झाडाखाली बसलेल्या वर्षाच्या अंगावर वीज कोसळली. वर्षाची आई आणि अनंत कांबळे यांनी मागे वळून पाहिले तर वर्षाच्या अंगावरील कपडे, डोक्याचे केस पेटत होते. त्यांनी तत्काळ जवळ जाऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला; पण तिचा जागीच मृत्यू झाला होता. ग्रामस्थांनी मृतदेह गावात आणल्यानंतर आई व लहान भाऊ विश्वनाथ यांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद मुरगूड पोलीस ठाण्यामध्ये झाली. सायंकाळी मुरगूड ग्रामीण रुग्णालयामध्ये वर्षाच्या मृतदेहाचे विच्छेदन करून तो कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. रात्री करंजिवणे गावात शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)