‘महावितरण’ची गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 03:05 PM2019-08-23T15:05:47+5:302019-08-23T15:08:02+5:30
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ‘महावितरण’कडून सवलतीच्या व वहन आकारासह मात्र ४ रुपये ५५ पैसे प्रतियुनिट वीजदराने तात्पुरती वीजजोडणी देण्यात येणार आहे. तरी मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी; तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे.
कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ‘महावितरण’कडून सवलतीच्या व वहन आकारासह मात्र ४ रुपये ५५ पैसे प्रतियुनिट वीजदराने तात्पुरती वीजजोडणी देण्यात येणार आहे. तरी मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी; तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे.
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये २७ पैसे अधिक १ रुपया २८ पैसे वहन (व्हीलिंग) आकार असे वीजदर आहेत. या वीजजोडणीद्वारे वीजवापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात वीज वापरली तरीही शेवटच्या युनिटपर्यंत केवळ ४ रुपये ५५ पैसे प्रतियुनिट एवढाच दर आकारण्यात येईल.
गणेश मंडळांना प्राधान्याने वीजजोडणीसाठी सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले असून, वीजभार ०.५ किव्होकरिता एक हजार रुपए वीजजोडणी खर्च आकारण्यात येईल. मंडळाच्या वीजभारानुसार सुरक्षा ठेव रक्कम आकारण्यात येईल. उत्सवानंतर ही रक्कम मंडळाच्या खात्यात महावितरणकडून आॅनलाईनद्वारे परतावा करण्यात येईल.
वीजयंत्रणेची काळजी घ्या
या कालावधीत पावसाचे संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मंडळांनी मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत.
विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. मंडपातील वीजयंत्रणेची दैनंदिन तपासणी करण्यात यावी. तातडीच्या मदतीसाठी १९१२ किंवा १८००१०२३४३५ या महावितरणच्या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.