उद्योगांना रात्री कमी दरात वीज
By admin | Published: January 20, 2016 01:10 AM2016-01-20T01:10:47+5:302016-01-20T01:14:16+5:30
मुंबईतील बैठक : ऊर्जामंत्र्यांचे उद्योजकांना आश्वासन
सतीश पाटील -- शिरोली‘मेक इन इंडिया’अंतर्गत ‘मेक इन महाराष्ट्र’ ही संकल्पना साकारण्यासाठी शासन महत्त्वाची पावले उचलत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जास्तीत जास्त उद्योगांना चालना देण्यासाठी रात्रीच्या वेळेला कमी दरात वीजपुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी राज्यातील उद्योजकांना दिली.
उद्योग क्षेत्रात विजेचे दर कमी करण्याबाबत मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर तसेच राज्यातील उद्योजक आणि उद्योग संस्थांचे प्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीत उद्योजकांनी पोटतिडकीने आपली मते मांडली. अहमदनगरचे उद्योजक म्हणाले, सरकार विदर्भ-मराठवाड्याला कमी दराने वीज देणार आहे, मग आम्ही काय घोडे मारले आहे. एकाच राज्यात दोन वेगवेगळे दर, असे झाले तर पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत तुम्हाला याचा निश्चितच परिणाम दिसेल. पुण्यातील उद्योजकांनी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचे दर जास्त आहेत त्यामुळे येथील आॅटोमोबाईल उद्योग स्थलांतरित केला आहे, यावर वेळीच विचार करावा, असे सांगितले. कर्नाटक सरकार कोल्हापूरच्या उद्योजकांना सवलतीच्या दरात वीज, पाणी, जमीन देण्यास तयार आहे. त्यामुळे येथील उद्योजक कर्नाटकमध्ये जाण्याचा विचार करत आहेत. तरी शासनाने वीज दराबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी कोल्हापूरसह आठ उद्योजकांनी केली.
यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्योजकांनी रात्रीच्या वेळी विजेचा वापर करावा, युनिटमागे दीड रुपया स्वस्त वीज मिळेल. आठ तासाऐवजी बारा तासांची पाळी केली जाईल, त्याचा फायदा उद्योजकांनी घ्यावा. महावितरण कंपनीचे सर्व इन्सेन्टिव्ह वापरा, आपल्याला वीज बिलात वीस टक्के सवलत मिळेल. २०१२-२०१३ सालचा अतिरिक्त सेवा शुल्क एप्रिल महिन्यापासून बंद केला जाईल. त्यामुळे नव्वद पैसे प्रतियुनिट वीज दर कमी होतील. याचा उद्योजकांना फायदा होईल.
बावनकुळे म्हणाले की, राज्यात सद्य:स्थितीत ऐंशी टक्के वीजनिर्मिती कोळशापासून केली जाते. उद्योगक्षेत्रातील विजेचे दर कमी करण्यासाठी वीज उत्पादनाचे आणि कोळशाचे दर कमी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कोळशा वाहतुकीचे दर कमी करण्याचीही गरज आहे. त्यासाठी रात्रीचे बारा तास वीज कमी दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे.
बावनकुळे म्हणाले...
उद्योजकांनी रात्रीच्या वेळी विजेचा वापर करावा, युनिटमागे दीड रुपया स्वस्त वीज मिळेल, आठ तासांऐवजी बारा तासांची पाळी केली जाईल.
महावितरण कंपनीचे सर्व इन्सेन्टिव्ह वापरा. आपल्याला वीज बिलात वीस टक्के सवलत मिळेल.
२०१२-१३ सालचा अतिरिक्त सेवा शुल्क एप्रिल महिन्यापासून बंद केला जाईल. त्यामुळे नव्वद पैसे प्रतियुनिट वीज दर कमी होतील. याचाही उद्योजकांना फायदा होईल.