जिल्ह्यातील १७७० कृषिपंपांना वीज जाेडण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:36 AM2021-02-26T04:36:45+5:302021-02-26T04:36:45+5:30
कोल्हापूर : नव्या कृषिपंप वीज जोडणी धोरणांतर्गत जिल्ह्यात १७७० शेतकऱ्यांना वीज जोडण्या दिल्या आहेत. वडगाव, कळे, गडहिंग्लज या उपविभागात ...
कोल्हापूर : नव्या कृषिपंप वीज जोडणी धोरणांतर्गत जिल्ह्यात १७७० शेतकऱ्यांना वीज जोडण्या दिल्या आहेत. वडगाव, कळे, गडहिंग्लज या उपविभागात तर पैसे भरल्याच्या २४ तासांच्या आत वीज जोडण्या देण्याचा पराक्रम महावितरणने करून दाखवला आहे.
जिल्ह्यात साठेआठ हजार शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत होते. त्यांच्यासाठी राज्य शासनाने ‘कृषिपंप वीज जोडणी धोरण 2020’ नवीन योजना आणली आहे. यात १ एप्रिल २०१८ नंतर पैसे भरून प्रलंबित असलेल्या व लघु दाब वाहिनीपासून ३० मीटर अंतर, रोहित्रावरील भार क्षमता अशा तांत्रिकदृष्ट्या शक्य असलेल्या पंपांना वीज जोडण्या प्राधान्याने दिल्या जात आहेत.
यातंर्गत जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजारांच्या वर पंप जाेडले आहेत. जयसिंगपूर विभागातील वडगाव उपविभागात विजयकुमार येवलुजे (मौजे नागाव, ता. हातकणंगले) यांना पैसे भरल्यानंतर पाच तासांत वीज जोडणी देण्यात आली. कोल्हापूर ग्रामीण विभाग एकमधील कळे उपविभागात तुकाराम पाटील (मौजे आकुर्डे, ता. पन्हाळा), गडहिंग्लज विभागात महादेव कागणीकर (मौजे चन्नेकुप्पी, ता. गडहिंग्लज), संतोष दड्डी (मौजे बड्याचीवाडी, ता. गडहिंग्लज, दोन वीज जोडण्या) या शेतकऱ्यांना पैसे भरल्यानंतर २४ तासांच्या आत कृषिपंप वीज जोडण्या दिलेल्या आहेत.
या धोरणानुसार कृषिपंप वीज जोडणीसाठी एक कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला असल्याचे महावितरण कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे, अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी सांगितले.