प्राथमिक शाळा जगल्या पाहिजेत -डॉ. राजन गवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:28 AM2021-03-01T04:28:31+5:302021-03-01T04:28:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गारगोटी : भुदरगड तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभागाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभागाने आपल्या नवनवीन संकल्पना शाळेत साकारून त्या आपल्या अपार कष्टातून यशस्वी करून दाखवल्याने इथल्या उपक्रमांची माहिती राज्यस्तरावरील शिक्षण विभागाला घ्यावी लागली. तालुक्याचा नावलौकिक राज्यात गाजविणाऱ्या या शिक्षक बहाद्दरांचा तालुकवासीयांसह राज्याला अभिमान आहे. यांनीच खऱ्या अर्थाने मराठी माध्यमातील शाळांना नवसंजीवनी दिली आहे, असे गौरवोद्गार आ. प्रकाश आबिटकर यांनी काढले.
कुमार भवन पुष्पनगर (ता. भुदरगड) येथे ‘आमच्या कल्पनेतील प्राथमिक शिक्षण’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि. २७) रोजी संपन्न झाले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस प्रमुख पाहुणे होते.
यावेळी डॉ. राजन गवस म्हणाले, मातृभाषा संपविण्याचा डाव जगभर चालू असून मुलाला त्याच्या त्याच्या मातृभाषेतून शिक्षण द्यावे. कारण तुमची भाषा ही तुमचे व्यक्तिमत्त्व असते. इंग्रजी शाळांमधून मुलांचे व्यक्तिमत्त्व दुभंगते.
यावेळी बी.एस. पाटील, मिलिंद पांगिरेकर, रणजित पाटील, राहुल देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. माझा वर्ग माझी ओळख या उपक्रमाच्या यशस्वीतेबद्दल विस्ताराधिकारी दीपक मेंगाणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सभापती कीर्ती देसाई, उपसभापती सुनील निंबाळकर, सरपंच संदेश भोपळे, सरपंच आर.बी. देसाई, गोकूळ संचालक विलास कांबळे, सत्यजित जाधव, गटशिक्षणाधिकारी रवींद्रनाथ चौगले, मुख्याध्यापक के.ए. देसाई आदींसह शिक्षक उपस्थित होते.
प्रास्ताविक अशोक कौलवकर यांनी केले, राजू शिंदे व सागर मोरे यांनी सूत्रसंचालन केले, तर दीपक मेंगाणे यांनी आभार मानले.
------------------------------
फोटो ओळ: पुष्पनगर (ता. भुदरगड) येथे ‘आमच्या कल्पनेतील प्राथमिक शिक्षण’ या पुस्तक प्रकाशन समारंभप्रसंगी आ. प्रकाश आबिटकर, डॉ. राजन गवस, कीर्ती देसाई, सुनील निंबाळकर, रवींद्रनाथ चौगले, दीपक मेंगाणे आदी. २) पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आ. आबिटकर बोलताना.