हत्तीकडून वनकर्मचाऱ्यांचा पाठलाग
By admin | Published: March 18, 2015 10:35 PM2015-03-18T22:35:56+5:302015-03-19T00:02:03+5:30
धनगरमोळा येथील घटना : काजू, उसाचे मोठे नुकसान
आजरा : धनगरवाडी धरण परिसरात वास्तव्यास असणाऱ्या टस्कर हत्तीने धनगरमोळा गावातील शेतात मंगळवारी रात्री धुमाकूळ घालत पाम वृक्ष, केळी व ऊस पिकाचे प्रचंड नुकसान केले. हत्ती हुसकावण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांसह वनखात्याच्या कर्मचाऱ्यांचा बिथरलेल्या हत्तीने पाठलाग केल्याने आता हत्तीला आवरायचे कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हत्तीचा पवित्रा पाहून वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडून काढता पाय घेतला.
सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हत्तीचे धनगरमोळा येथे आगमन झाले. शेतातील केळी, ऊस, खाल्ला व पाटील यांच्या घराजवळ आला. हत्ती घराच्या दिशेने येत असलेला पाहून हत्तीवर प्रकाशझोत टाकत फटाके वाजविण्यास सुरुवात केली. याच दरम्यान वनखात्याचे गस्तपथक धनगरमोळ्यात हजर झाले. त्यांच्याशी पाटील कुटुंबीयांनी दूरध्वनीवरून माहिती दिली. पथकातील कर्मचारी व पाटील कुटुंबीयांनी हत्तीला जंगलाच्या दिशेने हुसकावण्याचा प्रयत्न केला.
पुढे जाणाऱ्या हत्तीने अचानक मागे वळून सर्वांना रोखून धरले. हत्तीची आक्रमकता पाहून सर्वांनीच पाटील यांच्या घराच्या दिशेने काढता पाय घेतला. वनपाल गवस, रमेश पाटील, प्रकाश पाटील, श्रावण कृष्णा शेटगे, बाळकृष्ण बाबूराव पाटील, आदींचा यामध्ये समावेश होता. पुन्हा रात्रभर हत्तीने काजूची झाडे, ऊस, केळी, पामची झाडे यांचे प्रचंड नुकसान केले. पहाटेच्या वेळी धनगरवाडी धरणाच्या दिशेने तो निघून गेला. (प्रतिनिधी)