सिंधुदुर्गात हत्तींचे पुनरागमन, बागायती केल्या फस्त
By admin | Published: November 3, 2016 02:56 PM2016-11-03T14:56:32+5:302016-11-03T14:56:32+5:30
काही दिवस गायब असलेले वन्य हत्ती पुन्हा एकदा हेवाळे-बांबर्डे गावात दाखल झाले असून त्यांनी भात पिकाची उडवी व कापणी केलेले भातपिक फस्त केले.
Next
>
ऑनलाइन लोकमत
दोडामार्ग (जि.सिंधुदुर्ग), दि. ३ - गेले काही दिवस गायब असलेले वन्य हत्ती पुन्हा एकदा हेवाळे-बांबर्डे गावात दाखल झाले असून त्यांनी भात पिकाची उडवी व कापणी केलेले भातपिक फस्त केले. ऐन भातपिक ताब्यात घेणेच्या वेळेलाच वन्य हत्ती पुन्हा दाखल झाल्याने बळीराजाच्या उरात प्रचंड धडकी भरली असून संपूर्ण हेवाळे, बाबरवाडी, घाटवाडी, बांबर्डे येथील शेतकरी कमालीचे हवालदिल झाले आहेत.
बऱ्याच दिवसानंतर पुन्हा दाखल झालेल्या हत्तीच्या कळपाने भात पिकाबरोबरच केळी, सुपारी, माड बागतीचेही अतोनात नुकसान केले आहे. वनखात्याकडे सातत्याने पाठपुरावा करूनही सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार विनायक राऊत यांचे सातत्याने लक्ष वेधूनही गेले वर्षभर हेवाळे बाबरवाडी परिसरात नुकसानी करणाऱ्या हत्तींचा बंदोबस्त अद्याप झालेला नाही. परिणामी नुकसान सत्र कायम असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे हत्तींचा बंदोबस्त करण्यात खासदार , पालकमंत्री उदासीन त्यामुळेच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान सरपंच संदीप देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान बांबर्डे व घाटीवडे येथील शेतकरी गोविंद बाबली गवस यांचे भात व केळी , विठ्ठल राणे यांची भात उडवी , अश्विनी आबासाहेब देसाई यांचे भात, वसंत सखाराम देसाई यांची केळी, विठ्ठल दत्ताराम देसाई केळी व सुपारी, भीमराव राणे यांच्या केळी व भातपिक , सिद्धेश राणे यांच्या केळी बागायतीचे नुकसान केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगढ तालुक्यातून गेल गॅस पाईप लाईनसाठी काढलेल्या मार्गाने बुधवारी रात्रौ २ च्या सुमारास २ हत्ती खाली उतरले. व त्यांनी बांबर्डे व घाटीवडे येथिल शेतकऱ्यांचे शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. गेले पंधरा दिवस हत्तींची जाग माग नसल्याने येथील शेतकरी निर्धास्त होते. मात्र बुधवारी रात्रौ दाखल झालेल्या हत्तींनी केलेलं नुकसान पाहता शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. दरम्यान वनपाल दत्ताराम देसाई यांनी वनरक्षक मुकाडे, लोकरे व वनमजूर देसाई यांच्या समवेत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला आहे. तर रात्रौ आलेले हत्ती आल्यामार्गाने पुन्हा माघारी परतल्याचा दावा केला आहे. मात्र खबरदारी म्हणून आज सायंकाळी ६ वाजलेपासून आपली हत्ती प्रतिबंधक टीम बांबर्डे येथे ठेवणार असल्याची माहिती वनपाल देसाई यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना वाली कोण?
पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार विनायक राऊत यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आमच्या हेवाळे गावावरील हत्ती संकट टळेल अशी आशा निर्माण झाली होती. १ जुलैला पालकमंत्री केसरकर यांनी स्वतः आमच्या हत्तीबाधित गावाची पाहणी करून हत्ती बंदोबस्त साठी ठोस उपाययोजना करू असे आश्वासन दिले होते. त्यामुळे निश्चित हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटत होते. मात्र अद्याप तशा कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नसल्याने किंबहुना त्या प्रस्तावित नसल्याने आमच्या शेतकऱ्यांना कोणी वाली नाही अशी आमची भावना आता नाईलाजास्तव निर्माण झाली आहे. मात्र रात्रंदिवस अतोनात मेहनत करणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी व त्यांना या संकटांतून सोडविण्यासाठो आपला लोकशाही मार्गाने लढा सुरूच राहील अशी प्रतिक्रिया दिली.