हत्तींचा मुक्काम आंबेरीतच वाढला
By admin | Published: April 17, 2015 11:28 PM2015-04-17T23:28:59+5:302015-04-18T00:07:16+5:30
अप्पर मुख्य वनसंरक्षक यांची माहिती
सावंतवाडी : आंबेरीत क्रॉलमध्ये ठेवण्यात आलेल्या ‘गणेश’ या हत्तीचा मृत्यू झाल्यानंतरही वनविभाग उर्वरित दोन हत्ती आणखी काही काळ तेथेच ठेवणार असून, प्रशिक्षणाचे अजून काही टप्पे पूर्ण व्हायचे आहेत. अन्य हत्तींसाठी प्रशिक्षण काळात दुसरी जागा बघण्यात येईल, असे मत वनविभागाचे अप्पर मुख्य वनसंरक्षक एच. एन. पाटील यांनी व्यक्त केले. ते सावंतवाडीतील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे वनसंरक्षक एम. के. राव, उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार, सहायक उपवनसंरक्षक प्रकाश बागेवाडी उपस्थित होते.यावेळी त्यांनी हत्तीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानेच झाल्याचे मान्य केले. तसेच हत्तीग्राम संकल्पना दोन हत्तींसाठी राबविणे चुकीचे असल्याचे सांगत हत्तीग्राम चर्चेलाही पूर्णविराम दिला.
आंबेरी येथे तीन हत्तींना पकडून ठेवण्यात आले होते. त्यातील ‘गणेश’ नावाच्या हत्तीचा आठवड्यापूर्वी मृत्यू झाला होता. यामुळे हत्ती प्रशिक्षणावरच शंका उपस्थित करण्यात आली होती. अनेकांनी हत्तींना पुन्हा जंगली अधिवासातच सोडा, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी वनविभागाचे अप्पर मुख्य वनसंरक्षक एच. एन. पाटील यांनी आंबेरी येथे भेट दिली.
त्यानंतर सावंतवाडीत बोलताना त्यांनी सांगितले की, हत्ती पकड मोहीम यशस्वी झाली. त्याला लोकांचे सहकार्यही चांगले लाभले. मात्र, ‘गणेश’ या हत्तीचा झालेला मृत्यू हा वनविभागाच्या चुकीमुळे झाला नसून, हत्तीचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यानेच झाला आहे. हत्तींना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाबाबत कोणत्याही त्रुटी नसून, इतर ठिकाणीही असेच प्रशिक्षण देण्यात येत असते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या तरी हत्तींना आंबेरीतून हलविण्याबाबत कोणताही विचार नसून, आम्ही नवीन जागेच्या शोधात आहोत; पण कोणत्याही निष्कर्षांपर्यंत पोहोचलो नाही. हत्तींना पहिल्या टप्प्यात तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. (प्रतिनिधी)