हत्तींचा मुक्काम आजऱ्यासह भुदरगड तालुक्यांतच राहणार
By admin | Published: February 16, 2015 10:14 PM2015-02-16T22:14:33+5:302015-02-16T23:10:47+5:30
नुकसान सहन करावे लागणार : पश्चिम बंगालप्रमाणेच कर्नाटकातही हत्तींची संख्या वाढल्याचा परिणाम
कृष्णा सावंत - पेरणोली -- गव्यांच्या वास्तव्यानंतर आता टस्कराचाही वावर वाढू लागला आहे. कर्नाटकात हत्तींची संख्या प्रमाणापेक्षा जादा झाल्याने आणि टस्कराने कार्यक्षेत्र निश्चित केल्याने भविष्यात टस्कराचा वावर आजरा व भुदरगड तालुक्यांतच राहणार आहे.आजरा व भुदरगड तालुक्यांत गव्यांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य वाढले आहे. दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. त्यात टस्करांचाही वावर आता दोन्ही तालुक्यांतच राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.टस्कर शांत व संयमी आहे. तो आपल्या मार्गाने सरळ जातो. त्याने निश्चित केलेल्या कार्यक्षेत्रात मार्गक्रमण करताना जुन्या व नव्या मार्गातील १५ फुटांच्या अंतरानेच चालतो. त्यामुळे झालीच तर एकाच मार्गावरील नुकसान होणार आहे.केळी व ऊस वगळता अन्य कोणत्याही पिकांची नुकसान टस्कर जाणीवपूर्वक करत नाही. त्याच्या पायामुळे होणारी नुकसान हीच खरी नुकसान आहे. तो सरळ मार्गाने जात असल्याने आतापर्यंत कोणावरही त्याने हल्ला केलेला नाही. कोणी तरी बिथरवले, तरच तो हल्ला करण्याची शक्यता आहेआजऱ्याच्या पश्चिम भागात दोन वर्षांपासून टस्कराचा वावर आहे. हाळोली, मसोली, वेळवट्टी, एरंडोळ, पोळगाव या ठिकाणी त्याचे वास्तव्य आहे. देवर्डे, पेरणोली, कोरीवडे, पाळाचा हुड्डा, अंतुर्ली, पाटगाव हा त्याचा मार्ग आहे. आजऱ्यामधून भुदरगड तालुक्यांत याच मार्गावरून तो सातत्याने जात आहे.पेरणोली, कोरिवडे परिसरात दोनवेळा टस्कर आला; परंतु तो एकाच मार्गाने जात असल्याने कोणत्याही प्रकारचे मोठे नुकसान व जीवितहानी झाली नाही. पेरणोलीकरांनी त्यास हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या जुन्या मार्गानेच त्याने भुदरगडमध्ये प्रवेश केला. त्यामुळे टस्कर आता आपल्यातलाच झाला असून, त्यानेही दोन्ही तालुक्यांतील परिसराला स्वीकारले आहे. त्यामुळे टस्करामुळे कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नसल्याचे मत वन विभागाचे आहे.
पश्चिम बंगालप्रमाणेच कर्नाटकातही हत्तींची संख्या जादा झाली आहे. त्यामुळे हा टस्कर जरी परत गेला, तरी दुसरा येणारच आहे. हत्तींचे स्थलांतर अटळ आहे. हत्तींना न बिथरवता त्याला मार्गक्रमण करू दिल्यास नुकसान कमी होऊ शकते. आतापर्यंत हत्तीमुळे एक टक्काही नुकसान झालेले नाही.
- राजन देसाई,
वनक्षेत्रपाल, आजरा