दुर्गा दौडच्या मार्गावर टिपू सुलतानचे उदात्तीकरण, कोल्हापुरातील कसबा बावड्यात तणाव

By उद्धव गोडसे | Published: October 16, 2023 12:37 PM2023-10-16T12:37:56+5:302023-10-16T12:38:32+5:30

समाज कंटकांवर कारवाई करण्याची तरुणांची मागणी, पोलिस बंदोबस्त वाढवला

Elevation of Tipu Sultan on the way to Durga Daud, tension in Kasba Bawa Kolhapur | दुर्गा दौडच्या मार्गावर टिपू सुलतानचे उदात्तीकरण, कोल्हापुरातील कसबा बावड्यात तणाव

दुर्गा दौडच्या मार्गावर टिपू सुलतानचे उदात्तीकरण, कोल्हापुरातील कसबा बावड्यात तणाव

कोल्हापूर : टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारा स्टेटस सोशल मीडियात ठेवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल चार दिवसांपूर्वीच पोलिसांनी एका संशयिताला कसबा बावड्यातून अटक केली होती. त्यानंतर सोमवारी (दि. १६) सकाळी दुर्गा दौडच्या मार्गावर अज्ञातांनी टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारा मजकूर लिहिल्याचे आढळल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. कसबा बावडा येथील शुगर मिल गाडी अड्डा येथे ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दरवर्षी नवरात्रोत्सवात तरुणांकडून कसबा बावड्यात दुर्गा दौडचे आयोजन केले जाते. सोमवारी सकाळी राजाराम साखर कारखाना परिसरातील गाडी अड्ड्याजवळ दुर्गा दौड पोहोचली असता, रस्त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिला असल्याचे तरुणांना दिसले. टिपू सुलतान याला हिंदुस्थानचा बादशहा ठरवणारा मजकूर पाहून संतप्त तरुणांनी पोलिसांना बोलवले. शाहूपुरी पोलिसांनी तातडीने मजकूर पुसून तरुणांना दुर्गा दौड शांततेत पूर्ण करण्याचे आवाहन केले. मात्र, संतप्त तरुणांनी भगवा चौकात एकत्र येऊन घटनेचा निषेध नोंदवत समाजकंटकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. 

शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक अजितकुमार सिंदकर यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला. दुपारी बारापर्यंत शेकडो तरुण भगवा चौकात ठाण मांडून बसले होते. टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारा मजकूर रस्त्यावर लिहिणा-या संशयितांचा शोध सुरू आहे. याचे पडसाद अन्य ठिकाणी उमटू नयेत, यासाठी खबरदारी घेतली जात असल्याची माहिती उपअधीक्षक टिके यांनी दिली.

Web Title: Elevation of Tipu Sultan on the way to Durga Daud, tension in Kasba Bawa Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.