साडेअकरा हजार लिटर लस साठवणुकीची क्षमता नावनोंदणीशिवाय लस नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:17 AM2020-12-16T11:17:15+5:302020-12-16T11:22:54+5:30
CoronaVirusUnlock, Kolhapur, CPR Hospital कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक साडेअकरा हजार लिटर लस साठवणूक करण्याची क्षमता असून, या माध्यमातून ४५ लाख ३९ हजार सात डोस दिले जाणार आहेत. मात्र पोर्टलवर नावनोंदणी केल्याशिवाय कोणालाही लस उपलब्ध होणार नाही.
समीर देशपांडे
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक साडेअकरा हजार लिटर लस साठवणूक करण्याची क्षमता असून, या माध्यमातून ४५ लाख ३९ हजार सात डोस दिले जाणार आहेत. मात्र पोर्टलवर नावनोंदणी केल्याशिवाय कोणालाही लस उपलब्ध होणार नाही.
कोरोनाची लस देण्यासाठीचे नियोजन सर्वच पातळ्यांवर सुरू आहे. जानेवारी २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नंतरच्या आठ दिवसांमध्ये गट अ मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. ही संख्या २० हजारांच्या पुढे आहे. यानंतर लगेचच दुसरा टप्पा सुरू होईल. ब गटासाठी दुसरा टप्पा असून यामध्ये संख्या अधिक असणार आहे. त्यानंतर क गटासाठी लसीकरण सुरू होणार आहे. तिसरा टप्पाही जास्त दिवस चालण्याची शक्यता आहे.
अ गट
- वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, नर्सेस, सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील सर्व कर्मचारी, वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी.
ब गट
- पोलीस दल, नागरी दल, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका कर्मचारी.
क गट
- ५० वर्षांवरील सर्व नागरिक आणि ज्यांना जुने आजार आहेत असे नागरिक
दोन, तीन वेळा डोस घ्यावे लागणार
शासनाकडून चार कंपन्यांचे व्हॅक्सिन पुरवण्यात येणार आहेत. यातील एका कंपनीचे डोस दोन वेळा घ्यावे लागणार आहेत; तर तीन कंपन्यांचे डोस तीन वेळा घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे हीच प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार आहे.
- लस साठवण उपलब्धता
- जिल्हास्तरीय : ६८७ लिटर
- जिल्हा परिषद व नगरपालिका : ९१३१ लिटर
- कोल्हापूर महापालिका : १५२६ लिटर
एकूण : ११,३४४ लिटर
तालुकानिहाय लस साठवण क्षमता (लिटरमध्ये)
- हातकणंगले १३८१
- करवीर १०६३
- शिरोळ ७३४
- राधानगरी ७१६
- शाहूवाडी ७०२
- गडहिंग्लज ६९९
- पन्हाळा ६२३
- कागल ५८५
- चंदगड ४६६
- भुदरगड ३२९
- आजरा ३२३
- गगनबावडा १३८
सध्या पहिल्या टप्प्यातील अ गटातील लस देण्यासाठी पात्र असणाऱ्यांची माहिती भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. साठवणुकीची जिल्ह्याची क्षमता चांगली असल्याने लस टंचाईचा प्रश्र्न येणार नाही
-दौलत देसाई
जिल्हाधिकारी कोल्हापूर.